गणेशोत्सवाचा देखावा बंद पाडून तलवारीचा नाच! सराईत गुंड अटक, विक्रमनगर येथील घटना
राजारामपुरी पोलिसांची कारवाई
कोल्हापूर प्रतिनिधी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सांस्कृतिक कार्यक्रम बंद पाडून तलवारीने दहशत माजविणाऱ्या सराईत गुंडास राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. सचिन शिवाजी आगलावे (वय 26, रा. विक्रमनगर) असे त्याचे नांव आहे. शनिवारी (दि. 14) रात्री पावणेबाराच्या सुमारास विक्रमनगर येथे स्वामी समर्थ मंदिराजवळील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सांस्कृतिक कार्यक्रम बंद पाडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत कॉन्स्टेबल राजाराम विष्णू पाटील यांनी फिर्याद दिली.
राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री विक्रमनगर येथील कॉलनीत गणेशोत्सव मंडळाचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी सचिन आगलावे हा मुलींच्या नृत्याचे मोबाइलवर चित्रीकरण करीत होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला हटकून मोबाइलमधील व्हिडिओ डिलिट करण्यास सांगितले. याचा राग आल्याने आगलावे हा घरी जाऊन तलवार घेऊन आला. तलवार नाचवत त्याने मंडळाचा सांस्कृतिक कार्यक्रम बंद पाडला. तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. परिसरातील नागरीकांनी तात्काळ याची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली. राजारामपुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आगलावे याला ताब्यात घेतले. त्यानुसार आगलावे याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आगलावे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत.
तलवार नाचविताना व्हिडीओ सोशल मिडीयावर
सचिन आगलावे याने तलवार नाचवीत दहशत माजविल्याचा व्हिडीओ शनिवारी रात्री उशिरा पासून सोशल मिडीयावर व्हायरल झाला. ही घटना सुरु असताना परिसरातील नागरीकांनी त्याचा व्हिडीओ केला होता.