For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इटली टेनिस स्पर्धेत स्वायटेक अजिंक्य

06:07 AM May 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
इटली टेनिस स्पर्धेत स्वायटेक अजिंक्य
Advertisement

वृत्तसंस्था/ रोम

Advertisement

डब्ल्यूटीए आणि एटीपी टूरवरील येथे रविवारी झालेल्या इटालियन खुल्या मास्टर्स आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकने दर्जेदार खेळाचे प्रदर्शन घडवित महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना द्वितीय मानांकित आर्यना साबालेंकाचा सरळ सेट्समध्ये पराभव केला.

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात टॉप सिडेड स्वायटेकने साबालेंकाचा 6-2, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. या रेड क्लेकोर्टवरील खेळविण्यात आलेल्या स्पर्धेतील स्वयटेकचे हे तिसरे अजिंक्यपद आहे. स्वायटेकने या स्पर्धेत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एकही सेट गमविलेला नाही. तसेच डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेत तिने सलग 12 सामने जिंकले आहेत. या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यता स्वायटेकने अमेरिकेच्या तृतीय मानांकित कोको गॉफचा 6-4, 6-3 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. पुढील आठवडाअखेर पॅरिसमध्ये फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत असून स्वायटेक सलग तिसऱ्यांदा जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे.

Advertisement

या सामन्यानंतर बक्षीस वितरणावेळी साबालेंकाने स्वायटेकच्या खेळाचे कौतुक केले. आता पुढील आठवड्यात होणाऱ्या फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुन्हा आपली गाठ स्वायटेकबरोबर पडेल, असे भाकित साबालेंकाने वर्तविले. दोन आठवड्यापूर्वी झालेल्या माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत स्वायटेकने साबालेंकाचा 3 सेट्समधील लढतीत पराभव केला होता. इटालियन टेनिस स्पर्धेत स्वायटेकने 2021 आणि 2022 साली अजिंक्यपद मिळविले होते. तर रोममधील या स्पर्धेत 22 वर्षीय स्वायटेकने आतापर्यंत 20 सामने जिंकले असून केवळ 2 सामने गमविले आहेत. पुरुषांच्या विभागात राफेल नदालने इटालियन टेनिस स्पर्धा आतापर्यंत विक्रमी 10 वेळेला जिंकली आहे. स्वायटेकने या जेतेपदाबरोबरच चषक आणि 750,000 अमेरिकन डॉलर्स रकमेची कमाई केली.

Advertisement
Tags :

.