For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वायटेक अंतिम फेरीत, व्हेरेव्ह, अँड्रिव्हा उपांत्य फेरीत

06:00 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्वायटेक अंतिम फेरीत  व्हेरेव्ह  अँड्रिव्हा उपांत्य फेरीत
Advertisement

फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम : कोको गॉफ,आर्यना साबालेंका यांचे एकेरीत तर बोपन्ना-एब्डन यांचे दुहेरीतील आव्हान उपांत्य फेरीत समाप्त

Advertisement

वृत्तसंस्था /पॅरीस

2024 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत पोलंडच्या इगा स्वायटेकने कोको गॉफचे आव्हान संपुष्टात आणत अंतिम फेरी गाठली तर पुरुष एकेरीत जर्मनीच्या अॅलेक्झांडर व्हेरेव्हने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविताना ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरचा पराभव केला. व्हेरेव्हने या स्पर्धेत सलग चौथ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचप्रमाणे महिला एकेरीत रशियाच्या नवोदित 17 वर्षीय मिरा अँड्रीव्हाने पहिल्यांदाच फ्रेंच टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे. पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्ना व मॅथ्यू एब्डन यांचे आव्हान समाप्त झाले आहे. महिला एकेरीत अग्रमानांकित स्वायटेकने गॉफचा 6-2, 6-4 असा पराभव करून या स्पर्धेतील विजयाची मालिका 20 सामन्यावर नेली. गेल्या पाच वर्षात तिने चौथ्यांदा जेतेपद मिळविण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. सलग तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकून जस्टिन हेनिनच्या पंक्तीत बसण्याची तिला संधी आहे.  बारापैकी 11 सामन्यात तिने गॉफवर विजय मिळविला आहे.

Advertisement

पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या व्हेरेव्हने अॅलेक्स डी मिनॉरचा 6-4, 7-6 (7-5), 6-4 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. अलीकडच्या कालावधीत व्हेरेव्हने सलग 11 सामने जिंकले असून त्याची ही विजयी घोडदौड या स्पर्धेत कायम राहिली आहे. आता शुक्रवारी या स्पर्धेत व्हेरेव्हचा उपांत्य सामना कास्पर रुडशी होणार आहे. जर्मनीचा व्हेरेव्ह वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्यासाठी आतुरलेला आहे. 2022 साली या स्पर्धेत नॉर्वेच्या कास्पर रुडला अंतिम सामन्यात स्पेनच्या नदालकडून तर 2023 साली त्याला अंतिम सामन्यात जोकोविचकडून पराभव पत्करावा लागला होता. 2022 च्या अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत रुडला अंतिम सामन्यात स्पेनच्या अल्कारेझने पराभूत केले होते. अन्य एका सामन्यात स्पेनच्या अल्कारेझने ग्रीकच्या सित्सिपसचा 6-3, 7-6(7-1), 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत शुक्रवारी सिनर आणि अल्कारेझ तसेच व्हेरेव्ह आणि कास्पर रुड यांच्यात उपांत्य फेरीचे सामने होतील. महिला एकेरीत रशियाच्या बिगर मानांकित 17 वर्षीय मिरा अँड्रीव्हाने द्वितीय मानांकित आर्यना साबालेंकाचा पराभव करत शौकिनांना अनपेक्षीत धक्का दिला. अँड्रीव्हाने साबालेंकाचा 6-7 (5-7), 6-4, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

रायबाकिनाही चकित

त्याचप्रमाणे महिला विभागात गुरुवारी आणखी एक धक्कादायक पराभव पहावयास मिळाला. इटलीच्या 28 वर्षीय जस्मीन पावोलिनीने चौथ्या मानांकित इलिना रायबाकिनाचा 6-2, 4-6, 6-4 असा फडशा पाडला.  पुरुष दुहेरीमध्ये भारताचा रोहन बोपन्ना आणि ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डनचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले. पुरुष दुहेरीच्या उपांत्य सामन्यात इटलीच्या सिमोनी बोलेली आणि अँड्रिया वेव्हासोरी यांनी बोपन्ना व एब्डन यांचा 7-5, 2-6, 6-2 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. मियामी मास्टर्स टेनिस स्पर्धेत तसेच ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत बोपन्ना आणि एब्डन यांनी पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद मिळविले होते.

Advertisement
Tags :

.