सलामीच्या पराभवानंतर गुकेशचे पुनरागमन, लिरनेशी बरोबरे
वृत्तसंस्था/ सिंगापूर
भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने मंगळवारी येथे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील गतविजेत्या चीनच्या डिंग लिरेनविऊद्धचा फारसा उत्कंठावर्धक न ठरलेला दुसरा सामना अनिर्णीत अवस्थेत सोडविला. काळ्या सोंगाट्यासह खेळताना गुकेशने एक प्रकारे पुनरागमन केले असेच म्हणावे लागेल. कारण 14 लढतींच्या या स्पर्धेतील सोमवारी झालेल्या सलामीच्या लढतीत लिरेनकडून त्याला पराभव पत्करावा लागला होती.
गुकेशची ही उसळी चांगली होती. कारण लिरेन पांढऱ्या सेंगाट्यासह खेळत असतानाही फारच कमी प्रभाव पाडू शकला आणि त्याला शेवटी गुण विभागून घेण्यावर समाधान मानावे लागले. ‘जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत काळ्या सोंगाट्या घेऊन खेळताना बरोबरीत लढत सोडविणे हे नेहमीच छान असते. हा खूप आधीचा टप्पा असून आमचा सामना आणखी बराच चालणार आहे’, असे चेन्नईस्थित ग्रँडमास्टर गुकेशने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
मला वाटते की, मी लढतीच्या सुरुवातीला आश्चर्यचकीत झाल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया दिली आणि त्याला कोणतीही संधी दिली नाही. काळ्या सोंगट्या घेऊन खेळत असतानाही मी मजबूत खेळ केला, असे तो पुढे म्हणाला. गुकेशसाठी सोमवार हा दिवस फार वाईट राहून त्याने योजना आखल्या त्यानुसार काहीच घडले नव्हते. मात्र मंगळवारी सर्व काही बदलले. गुकेश याहून चांगली सुऊवात अपेक्षित करू शकत नाही. गुकेशने या लढतीत मूलभूत गोष्टींचे पालन केले, तर लिरेननेही अजिबात दबाव टाकला नाही.
मला वाटते की, बुधवारी मोठी लढत होईल. कारण गुकेश एका गुणाने पिछाडीला आहे आणि त्याच्याकडे पांढऱ्या सोंगाट्या असतील. मी लढाईसाठी तयार आहे, असे लिरनने म्हटले आहे. या दोन्ही खेळाडूंमधील लढतींचा विचार करता लिरेनकडे क्लासिकल गेम्समध्ये तीन गुणांची आघाडी आहे आणि टीम गुकेश या स्पर्धेमध्ये ती कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करेल.