For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्विस खुली बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

06:26 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्विस खुली बॅडमिंटन स्पर्धा आजपासून
Advertisement

वृत्तसंस्था/ बेसिल (स्विस)

Advertisement

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या स्विस खुल्या सुपर 300 दर्जाच्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला येथे मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत भारताचे बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन तसेच पी. व्ही. सिंधू हे आपला हरवलेला सूर मिळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतील.

भारताचा लक्ष्य सेन याला 2024 च्या बॅडमिंटन हंगामातील प्रारंभी झालेल्या मलेशिया सुपर 1000 दर्जाच्या तसेच इंडिया सुपर 750 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धांमध्ये पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. पण त्यानंतर फ्रेंचे खुल्या आणि अखिल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत 22 वर्षीय लक्ष्य सेनने पाठोपाठ उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. स्विस खुली बॅडमिंटन स्पर्धा लक्ष्य सेन आणि सिंधू यांच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची ठरणार आहे. 210,000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत सातवा मानांकित लक्ष्य सेनचा सलामीचा सामना मलेशियाच्या लियाँग हेओशी होणार आहे. तर माजी टॉप सिडेड किदांबी श्रीकांतचा पहिल्या फेरीतील सामना चीन तैपेईच्या वेंग वेईशी होणार आहे. स्विस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा नवोदित प्रियांशू राजवतचा सलामीचा सामना हाँगकाँगच्या ली यिउशी होईल.

Advertisement

महिलांच्या विभागात भारताच्या पी. व्ही. सिंधूच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. फ्रेंच बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूने निम्मा टप्पा गाठला होता. मात्र अखिल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत तिचे आव्हान लवकरच संपुष्टात आले होते. आता पी. व्ही. सिंधूचा स्विस स्पर्धेतील सलामीचा सामना जर्मनीच्या ली बरोबर होणार आहे. अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत गेल्या आठवड्यात झालेल्या सलामीच्या सामन्यात सिंधू विरुद्ध जर्मनीच्या लीने दुखापतीमुळे माघार घेतली होती. स्विस स्पर्धेमध्ये सिंधूने पहिल्या दोन फेरीतील सामने जिंकले तर तिची गाठ स्पेनच्या कॅरोलीना मॅरिनशी पडू शकेल. कॅरोलीना मॅरेनने अलिकडेच अखिल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. महिला दुहेरीत अश्विनी पोनाप्पा-तनिशा क्रेस्टो तसेच ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

Advertisement
Tags :

.