सनरायझर्स हैदराबाद ‘प्लेऑफ’साठी पात्र
वृत्तसंस्था /हैदराबाद
2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. या स्पर्धेतील गुरुवारचा सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना एकही चेंडू न टाकताना पावसामुळे रद्द करावा लागला. या स्पर्धेत प्लेऑफसाठी पात्र ठरणारा सनरायझर्स हैदराबाद हा तिसरा संघ आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांनी यापूर्वीच प्लेऑफ गटातील आपले स्थान निश्चित केले होते. स्पर्धेच्या गुणतक्त्यात कोलकाता नाईट रायडर्स पहिल्या तर राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील रद्द झालेल्या सामन्यात दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला. हैदराबाद संघाने 15 गुण घेतले असून त्यांचा एक सामना बाकी आहे. हैदराबादचा शेवटचा सामना पंजाब किंग्ज बरोबर 19 मे रोजी होणार आहे. या स्पर्धेतील प्राथमकि फेरीतील हा शेवटचा सामना आहे. पंजाब संघाचे आव्हान यापूर्वीच समाप्त झाले आहे. 2022 साली आयपीएल स्पर्धा जिंकणारा तर 2023 साली आयपीएल स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणाऱ्या गुजरात टायटन्स संघाचे प्लेऑफ शर्यतीतील आव्हान यापूर्वीच्या सामन्यात संपुष्टात आले होते. गुजरातचा 13 मे रोजीचा कोलकाता संघाबरोबरचा सामना पावसामुळे वाया गेला होता. गुजरात टायटन्सने 2024 च्या आयपीएल स्पर्धेत 14 सामन्यातून 12 गुणासह आपली मोहित संपुष्टात आणली.
हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील गुरुवारच्या सामन्यात निर्धारित खेळ सुरु होण्यापूर्वीच मुसळधार पावसाचे जोरदार आगमन झाले. पावसाच्या सरी मोठ्या असल्याने मैदानावर बऱ्याच ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे या सामन्यातील सायं. 7 वाजता नाणेफेक करण्यात आले नाही. खेळपट्टीवर कव्हर्स घालण्यात आले. सुमारे दीड तास पावसाच्या सरी कोसळत असल्याने पंचांनी किमान दोन वेळेला खेळपट्टी आणि मैदानाची पाहणी केली. 10.56 पर्यंत पावसाने विश्रांती घेतली असती तर कदाचित पंचांनी प्रत्येकी 5 षटकांचा खेळ खेळविला असता. पण किरकोळ पावसाच्या सरी चालूच असल्याने पंचांनी अखेर हा सामना रद्द केल्याची घोषणा केली. या स्पर्धेत पावसामुळे वाया गेलेला हा दुसरा सामना आहे. आता प्लेऑफ फेरीत चौथे स्थान मिळविण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात अद्याप चुरस राहिल. शुक्रवारी मुंबई इंडियन्स विरुद्धचा सामना लखनौने जिंकला तर त्यांचे 14 गुण होतील. त्यामुळे ते प्लेऑफच्या शर्यतीत राहू शकतील पण शनिवारच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा पराभव केल्यास चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित करेल. तसेच शनिवारचा सामना पावसामुळे रद्द झाला तरी चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. शनिवारच्या सामन्यात बेंगळूर संघाने प्लेऑफसाठी आपले आव्हान जीवंत ठेवण्याकरीता चेन्नई सुपर किंग्जचा किमान 18 धावांनी किंवा 11 चेंडू बाकी ठेऊन पराभव करने गरजेचे आहे.