स्विगीचा 400 शहरात फूड डिलिव्हरी सेवेचा विस्तार
वृत्तसंस्था/ मुंबई
फूड डिलिव्हरी क्षेत्रातील कंपनी स्विगी यांनी 10 मिनीटात खाद्य पदार्थ पोहोच करण्याची सेवा आता लवकरच देशातील 400 शहरांमध्ये विस्तारण्याचे निश्चित केले आहे. तसे सुतोवाच कंपनीकडून सोमवारी करण्यात आले आहे.
बोल्ट असे या सेवेचे नाव असून ही सेवा भारतात ऑक्टोबरमध्ये सुरु करण्यात आली आहे. ही सेवा मुंबई, हैदराबाद, दिल्ली, पुणे, चेन्नई आणि बेंगळूर या शहरात कार्यरत झाली आहे. शेअरबाजारात सुचीबद्ध झालेली स्विगी आपल्या बोल्ट सेवेचा विस्तार आता पुढील काळात टायर 2, 3 शहरांमध्ये देखील करणार आहे. गुंटूर, रुरकी, वारंगल, पटना सोलन, नाशिक, शिलाँग या शहरांचा यात समावेश आहे.
समभाग तेजीत
या बातमीनंतर सोमवारी सरतेशेवटी स्विगीचे समभाग 5.1 टक्के इतके वाढत 495 रुपयांवर बंद झाले होते. या सेवेअंतर्गत कंपनी 2 किलोमीटरच्या परिघातील रेस्टॉरंटमधील ऑर्डर ग्राहकांना पोहचवते. केएफसी, मॅकडोनाल्ड, बर्गर किंग, बास्कीन रॉबीन्स, स्टारबक्स, इटफिट यासारख्या चेनसह इतर 40 हजार रेस्टॉरंटमधून ऑर्डर केलेले खाद्य कंपनी ग्राहकांपर्यंत पोहचवते.
स्पर्धेत टक्कर देण्यासाठी सज्ज
बेंगळूरात मुख्यालय असणाऱ्या स्विगीने आता फूड डिलिव्हरी क्षेत्रात स्पर्धात्मक स्तरावर उतरण्याची तयारी पूर्णपणे केलेली आहे. झोमॅटो या स्पर्धक कंपनीला चांगली टक्कर स्विगी आगामी काळात देईल, हे नक्की. नव्या विस्तारातून बाजारातील हिस्सेदारी वाढवण्यासाठी कंपनी धडपडताना दिसणार आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांच्या मागच्या महिन्याच्या अहवालात झोमॅटोची हिस्सेदारी 58 टक्के तर स्विगीची हिस्सेदारी 42 टक्के इतकी राहिली असल्याचे म्हटले आहे.
स्विगीला 626 कोटीचा तोटा
ऑनलाईन फूड डिलीव्हरी कंपनी स्विगी यांनी आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला. या अंतर्गत पाहता कंपनीने सदरच्या अवधीत 626 कोटी रुपयांचा एकत्रित तोटा सहन केला आहे. मागच्या वर्षी कंपनीने 657 कोटी रुपयांचा तोटा सहन केला होता. वर्षाच्या आधारावर पाहता कंपनीचा तोटा 4 टक्के कमी झाला. जुलै-सप्टेंबर तिमाहीमध्ये महसूल 30 टक्के वाढत 3601 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. स्विगीचा समभाग 13 नोव्हेंबरला शेअरबाजारात लिस्ट झाला होता. आतापर्यंत हा समभाग 14 टक्क्यांच्या तेजीसोबत कामगिरी करतो आहे.