स्वायटेक, साबालेन्का, अल्कारेझ चौथ्या फेरीत
पाएलिनी, किनवेन, शेल्टन, रुने, टॉमी पॉल, टायफो यांची आगेकूच, ओस्टापेन्का स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था/ पॅरिस
पोलंडची इगा स्वायटेक, अग्रमानांकित एरिना साबालेन्का, स्पेनचा कार्लोस अल्कारेझ यांनी फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत स्थान मिळविले. मात्र अल्कारेझला विजयासाठी संघर्ष करावा लागला. याशिवाय जस्मिन पाओलिनी, रायबाकिना, झेंग किनवेन, होल्गर रुने, टॉमी पॉल, टायफो, बेन शेल्टन यांनीही पुढील फेरीत स्थान मिळविले.
तीन ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविणाऱ्या साबालेन्काला प्रेंच ओपनमध्ये मात्र फक्त एकदाच उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली आहे. तिने येथे ओल्गा डॅनिलोविचचा 6-2, 6-3 असा पराभव केला. स्वायटेकने आतापर्यंत पाच ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. त्यापैकी चार तिने प्रेंच ओपनमध्ये मिळविली आहेत. तिने जॅकेलिन क्रिस्तियनला 6-2, 7-5 असे हरवित आगेकूच केली. यातील दुसऱ्या सेटमध्ये सव्वातास स्वायटेकची परीक्षा झाली. प्रेंच ओपनमधील तिचा हा सलग 23 वा विजय आहे. स्वायटेक व साबालेन्का यांच्या फॉर्ममध्ये तफावत दिसून येते. साबालेन्काने या वर्षात सहा स्पर्धांत एकेरीच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले तर मागील वर्षी येथील स्पर्धा सलग तिसऱ्यांदा जिंकल्यानंतर स्वायटेकला एकाही स्पर्धेची अंतिम फेरी गाठता आलेली नाही.
पुरुष एकेरीत विद्यमान विजेता कार्लोस अल्कारेझला बोस्निया हरझेगोविनाच्या दामिर झुमहुरवर 6-1, 6-3, 4-6, 6-4 असा विजय मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. सव्वा तीन तास ही झुंज रंगली होती. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत केवळ दोन सेट गमविले आहेत. गेल्या वर्षीच्या मे नंतर अल्कारेझने क्ले कोर्टवर 30-2 असे रेकॉर्ड केले आहे. त्यात प्रेंच ओपन व 2024 पॅरिस ऑलिम्पिकमधील रौप्यपदकाचा समावेश आहे. या वर्षात त्याने माँटे कार्लो व रोम येथील क्ले कोर्टवर एटीपी 1000 मास्टर्स स्पर्धांची अजिंक्यपदे मिळविली आहेत. त्याची पुढील लढत 13 व्या मानांकित बेन शेल्टनशी होईल. शेल्टनने मॅटेव गिगान्टेवर 6-3, 6-3, 6-4 अशी मात केली.
अन्य एका सामन्यात डेन्मार्कच्या दहाव्या मानांकित होल्गर रुनेने फ्रान्सच्या क्वेन्टिन हॅलीसवर 4-6, 6-2, 5-7, 7-5, 6-2 अशी मात केली.
महिलांच्या अन्य सामन्यात चौथ्या मानांकित व मागील वर्षीची उपविजेती जस्मिन पाओलिनीने युक्रेनच्या युलिया स्टारोडबत्सेव्हाचा 6-4, 6-1, बाराव्या मानांकित इलेना रायबाकिनाने 2017 ची चॅम्पियन एलेना ओस्टापेन्कोचा पराभव केला. ऑलिम्पिक चॅम्पियन चीनच्या झेंग किनवेनने 18 वर्षीय क्वालिफायर व्हिक्टोरिया एम्बोकोचा तर 16 वी मानांकित अमांदा अॅनिसिमोव्हा व ल्युडमिला सॅमसोनोव्हा यांनीही आगेकूच केली. पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत 8 व्या मानांकित लॉरेन्झो मुसेटीने मारियाओनो नाव्होनचा, 12 व्या मानांकित अमेरिकेच्या टॉमी पॉलने कॅरेन खचानोव्हचा, 15 व्या मानांकित फ्रान्सेस टायफोने 23 व्या मानांकित सेबास्टियन कोर्दाचा 7206 (8-6), 6-3, 6-4 असा पराभव करून चौथी फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्सी पॉपीरिननेही आगेकूच केली आहे.