स्वायटेक, मॅडिसन कीज, बेन शेल्टन उपांत्य फेरीत
नेव्हारो, स्विटोलिना, लॉरेन्झो सोनेगो स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था/ मेलबर्न
पोलंडची इगा स्वायटेक, अमेरिकेची मॅडिसन कीज, अमेरिकेचाच बेन शेल्टन यांनी येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला तर एम्मा नेव्हारो, युव्रेनची एलिना स्विटोलिना, लॉरेन्झो सेनेगो यांचे आव्हान संपुष्टात आले.
महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत दुसऱ्या मानांकित स्वायटेकने आठव्या मानांकित नेव्हारोचा 6-1, 6-2 असा एकतर्फी फडशा पाडला. या स्पर्धेत स्वायटेकने आतापर्यंत एकही सेट गमविलेला नाही. मात्र तिने एकूण 14 गेम्स गमविले आहेत. येथे पहिले आणि एकंदर सहावे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. यापूर्वी रशियाच्या मारिया शरापोव्हाने 15 पेक्षा कमी गेम्स गमवित उपांत्य फेरी गाठली होती. स्वायटेकची उपांत्य लढत 19 व्या मानांकित अमेरिकेच्या मॅडिसन कीजविरुद्ध गुरुवारी होईल. दुसरी उपांत्य लढत एरिना साबालेन्का व तिचीच मैत्रीण 11 वी मानांकित पॉला बेडोसाशी होईल. साबालेन्काने यापूर्वी सलग दोन वेळा ही स्पर्धा जिंकली असून ती हॅट्ट्रिकच्या मार्गावर आहे.
कीजची स्विटोलिनावर मात
कीजचे सर्वोत्तम प्रदर्शन 2017 मधील यूएस ओपन स्पर्धेत झाले होते. तिने त्या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. तिने येथील उपांत्यपूर्व सामन्यात स्विटोलिनावर 3-6, 6-3, 6-4 अशी मात केली. या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याची कीजची ही तिसरी वेळ आहे. स्वायटेक व मॅडिसन कीज यांच्यात आतापर्यंत पाच लढती झाल्या असून स्वायटेकने वर्चस्व राखत त्यापैकी चार लढती जिंकल्या आहेत. कीजने आतापर्यंत सलग दहा सामने जिंकले असून येथे येण्याआधी झालेल्या अॅडलेड टेनिस स्पर्धेत तिने जेतेपद मिळविले आहे. डॅनियली कॉलिन्स व एलिना रायबाकिना या दोन माजी उपविजेत्यांना हरवून तिने येथे उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. यापूर्वी 2015 व 2022 मध्ये तिने येथील स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. त्यावेळी विजेत्या ठरलेल्या सेरेना विल्यम्स व अॅश बार्टी यांच्याकडून तिला पराभूत व्हावे लागले होते.
शेल्टन पहिल्यांदाच उपांत्य फेरीत
पुरुष एकेरीतही एका अमेरिकन खेळाडूने उपांत्य फेरी गाठली आहे. 21 व्या मानांकित बेन शेल्टनने इटलीच्या बिगरमानांकित लॉरेन्झो सोनेगोवर 6-4, 7-5, 4-6, 7-6 (7-4) अशी मात केली. शेल्टनने पहिल्यांदाच या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. 2023 मध्ये त्याने यूएस ओपनची उपांत्य फेरी गाठली होती. त्याची उपांत्य लढत अग्रमानांकित व विद्यमान विजेता जेनिक सिनेर किंवा आठवा मानांकित अॅलेक्स डी मिनॉर यापैकी एकाशी होईल. शुक्रवारी पुरुषांची दुसरी उपांत्य लढत अलेक्झांडर व्हेरेव्ह व नोव्हॅक जोकोविच यांच्यात होणार आहे.
स्वायटेकला डबल बाऊन्स गुणाचा लाभ
स्वायटेक व नेव्हारो यांच्या लढतीतील दुसऱ्या सेटवेळी चेंडू डबल बाऊन्स झाला होता. त्यावर तिला गुणही मिळाला. पण नेव्हारो त्यावेळी खेळ थांबवून व्हिडिओ रिव्ह्यूची मागणी करावयास हवी होती. पण तिने तसे केले नाही आणि पंचांच्या लक्षातही ही गोष्ट आली नाही. नेव्हारोला परत चेक करण्याची संधी देण्यात आली नाही. हा गुण जरी नेव्हारोला मिळाला असता तरी सामन्याच्या निकालावर त्याचा फारसा परिणाम झाला नसता. कारण स्वायटेकने या सामन्यावर पूर्ण वर्चस्व राखले होते.