स्वायटेक विम्बल्डनची नवी राणी
वृत्तसंस्था / लंडन
2025 च्या विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत पोलंडच्या इगा स्वायटेकने अमेरिकेच्या अमंदा अॅनिसिमोव्हाचा एकतर्फी पराभव करत विम्बल्डनच्या थाळीवर आपले नाव पहिल्यांदाच कोरले. प्रतिष्ठेच्या विम्बल्डन स्पर्धेतील इगा स्वायटेक नवी सम्राज्ञी ठरली.
शनिवारी महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात इगा स्वायटेकने अॅनिसिमोव्हाचा 6-0, 6-0 अशा सरळ सेट्समध्ये तासभराच्या कालावधीत एकतर्फी फडशा पाडला. या अंतिम सामन्यातील पहिल्या गेमपासूनच स्वायटेकने आपल्या दर्जेदार खेळाचे प्रदर्शन घडवित प्रत्येक गुण वसुल करताना अॅनिसिमोव्हाला नमविले. अप्रतिम बेसलाईन खेळ तसेच वेगवान सर्व्हिस आणि फोरहॅन्ड आणि बॅकहॅन्डच्या तंत्रशुद्ध वेगवान फटक्यांच्या मिश्रणाने अॅनिसिमोव्हाला या सामन्यात शेवटपर्यंत एकही गुण मिळू शकला नाही. उत्कृष्ट मानसिक स्थिरता, लय आणि दर्जेदार खेळाच्या मिश्रणाचे दर्शन या सामन्यात स्वायटेकने घडविले. अमेरिकेच्या अॅनिसिमोव्हाने सहावेळा आपल्या सर्व्हिसवर 30 पैकी 24 गुण आश्चर्यरित्या मिळविले. यासंपूर्ण सामन्यामध्ये अॅनिसिमोव्हाला एकही गेम जिंकता आला नाही. स्वायटेकचे विम्बल्डन स्पर्धेतील हे पहिले जेतेपद असून तिने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत एकूण पाच ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. शनिवारच्या अंतिम सामन्यात स्वायटेकने बेसलाईन खेळावर सुरुवातीला भर दिल्यानंतर तिने टेनिस कोर्टच्या परिसरात विविध फटक्यांचे दर्शन घडविले. या अंतिम सामन्यात स्वायटेकच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब करताना कोणत्याही तज्ञ टेनिसपटूकडे कोणतेच उत्तर नव्हते. स्वायटेकने यापूर्वी फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा चारवेळा तर अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा एकदा जिंकली असून विम्बल्डनच्या स्पर्धेत तिने आपल्या जेतेपदाचे खाते उघडले.