For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जांबोटी-बैलूर परिसरात रताळी लागवडीला वेग

10:49 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
जांबोटी बैलूर परिसरात रताळी लागवडीला वेग
Advertisement

पावसामुळे रताळी लागवडीला पोषक वातावरण : शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज

Advertisement

वार्ताहर /जांबोटी

जांबोटी-बैलूर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे माळरानावरील जमिनीत रताळी लागवडीला पोषक वातावरण निर्माण झाले असून सध्या या भागात रताळी लागवडीच्या कामाला वेग आला आहे.खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात रताळी उत्पादनासाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे या भागातील बैलूर, जांबोटी, ओलमणी, आमटे, कालमणी, तोराळी, गोल्याळी, उंचवडे, मोरब, बेटगेरी, कुसमळी, दारोळी आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रताळी लागवड करण्यात येते. रताळी हे या भागातील प्रमुख नगदी पीक असल्याने त्यापासून शेतकरी वर्गांना बऱ्यापैकी आर्थिक लाभ मिळतो. या भागातील शेतकरी वर्ग खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात रताळी लागवड करतात. साधारणपणे जून महिन्याच्या प्रारंभी शेतकरी वर्ग ट्रॅक्टरच्या साहाय्याने जमिनीची नांगरट करून रताळी लागवडीसाठी आवश्यक मेरा तयार करतो. त्यानंतर संततधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर त्यावर रताळी वेलांची लागवड करण्यात येते.

Advertisement

संततधारला विलंब-लागवडीला उशीर

वास्तविक जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात रताळी लागवडीला प्रारंभ करण्यात येतो. यावर्षी या भागात मान्सूनचे आगमन वेळेत झाले होते. परंतु रताळी लागवडीसाठी आवश्यक असणाऱ्या संततधार पावसाला जूनच्या शेवटी प्रारंभ झाल्यामुळे लागवडीला देखील काहीसा विलंब झाला आहे. जून महिन्यात रताळी वेलांची लागवड केल्यानंतर साधारणपणे ऑक्टोबरपासून रताळी उत्पादनाला प्रारंभ होते. रताळी उत्पादनाचा हंगाम साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत चालतो. या भागातील शेतकरी वर्ग बेळगाव येथील मार्केट यार्डमध्ये रताळी विक्रीसाठी घेऊन जातात. गुजरात, दिल्ली, मुंबई आदी ठिकाणी रताळी पिकाला मोठी मागणी असल्यामुळे शेतकरी वर्गाला यापासून आर्थिक लाभ मिळतो. रताळी हे या भागातील प्रमुख नगदी पीक असले तरी या पिकाच्या लागवडी संदर्भात शेतकरी वर्गांना कृषी खात्यामार्फत योग्य मार्गदर्शन होत नाही. त्यामुळे रताळी पिकाला वाळवी व इतर किडीचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात जमिनीमध्येच रताळी खराब होत असल्याने शेतकरी वर्गाला आर्थिक फटका बसतो.

Advertisement
Tags :

.