पश्चिम भागात रताळी वाढ खुंटली
अतिवृष्टीचा फटका, उत्पादनात घट होण्याची शक्यता : शेतकरीवर्गात चिंता वाढली
वार्ताहर/किणये
तालुक्याच्या पश्चिम भागात खरीप हंगामात रताळी पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. यंदाही शेतकऱ्यांनी रताळी लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र या हंगामात अतिवृष्टी झाल्यामुळे रताळी वेलीची वाढ खुंटली. वेलीवर रोग पडला आहे. यामुळे यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. तसेच रताळी वेलीवर रोग पडल्यामुळे बरेच शेतकरी औषध फवारणी करताना दिसत आहेत.
पूर्वी रताळी पिकांचे उत्पादन केवळ खरीप हंगामात घेण्यात येत होते. अलीकडच्या पाच सहा वर्षात काही शेतकरी उन्हाळ्यातही रताळी लागवड करीत आहेत. काही शेतकऱ्यांनी एप्रिल-मे महिन्यात उन्हाळी रताळी वेलीची लागवड केली होती. काढणी सध्या चालू असून काही तुरळक भागातही लागवड केली आहे. दसऱ्याच्या सणानिमित्त ही काढणी सुरू असून त्याला दरही बऱ्यापैकी मिळत आहे. मात्र बहुतांशी शेतकऱ्यांनी खरीप हंगामातच रताळी लागवड केली आहे.
यंदा वेल लागवडीच्या कालावधीत जोरदार पाऊस झाला. यामुळे त्याचा परिणाम रताळी पिकांवर झाला आहे. काही ठिकाणी रताळी वेल वाढली तर काही ठिकाणी वाढ खुंटल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. बेळगुंदी, बाकनूर, यळेबैल, सोनोली, राकसकोप, बिजगर्णी, बेळवट्टी, कावळेवाडी, इनाम बडस, जानेवाडी, नावगे, बहाद्दरवाडी, किणये, वाघवडे, बाळगमट्टी, झाडशहापूर आदींसह पश्चिम भागात ही लागवड अधिक प्रमाणात केली आहे. रताळी पिकांच्या उत्पादनावर बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. खरीप हंगामातील रताळी पिकांची काढणी दिवाळीनंतर करण्यात येणार आहे. बऱ्याच शिवारामध्ये रताळी वेलीवर रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.रोगावर नियंत्रण आणण्यासाठी शेतकरी औषध फवारणी करताना दिसत आहे.