रताळी उत्पादक शेतकरी अडचणीत
अतिरिक्त पावसामुळे पिकांचे नुकसान : लागवड आहे पण, वाढ नसल्याने उत्पादनात घट
बेळगाव : यावर्षी पावसाने जोरदार दणका दिल्याने रताळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. रताळ्यांना लागवड असली तरी पावसामुळे योग्य प्रमाणात वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तसेच रताळी काढणीमध्येही पावसाचा व्यत्यय येत असल्याने तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस जाण्याची वाट पाहिली जात आहे. बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी, बिजगर्णी, बाकनूर, उचगाव, बसुर्ते, बेकिनकेरे, तुरमुरी, कल्लेहोळ तर खानापूर तालुक्यातील बैलूर व चंदगड तालुक्यातील तुडये शिनोळी भागात मोठ्या प्रमाणात रताळ्यांची लागवड होते. दरवर्षी दसऱ्यापासून काढणीला सुरुवात होते. परंतु यावर्षी अद्याप परतीचा पाऊस असल्याने रताळी काढण्यात व्यत्यय येत आहे. त्यातच यावर्षी रताळ्यांची वाढ झाली नसल्याचे दिसून येत आहे.
काढणीचा खर्च देखील निघणार नसल्याने शेतकरी हतबल
बुधवारी चांगल्या दर्जाच्या रताळ्यांना 2000 ते 3000 रुपये दर असतानाही रताळ्यांची आवक मात्र मंदावल्याचे दिसून आले. यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे रताळ्यांची वाढच खुंटली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. रताळ्यांची वाढ न झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी काढणीचा विचारच सोडला आहे. कारण काढणीसाठी लागणारा खर्च देखील निघणार नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने रताळ्यांवर किडीचा प्रादुर्भाव जाणवला होता. त्यामुळे उत्पादन घटले. यावर्षी अतिपावसामुळे रताळ्यांची वाढच झाली नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकरी वर्ग दोन्ही बाजूंनी आर्थिक अडचणीत सापडला आहे.