For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वायटेक, साबालेंका, रायबाकिना तिसऱ्या फेरीत

06:05 AM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्वायटेक  साबालेंका  रायबाकिना तिसऱ्या फेरीत
Advertisement

सिनर, डिमिट्रोव्ह तिसऱ्या फेरीतफ्रेंच ओपन टेनिस : यानिक सिनर, डिमिट्रोव्ह यांचीही आगेकूच, नाओमी ओसाका, रुस, गॅसकेट, झिदान्सेक, पेरी यांचे आव्हान समाप्त

Advertisement

वृत्तसंस्था /पॅरिस

2024 च्या टेनिस हंगामातील येथे सुरु असलेल्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष विभागात इटलीचा यानिक सिनर, बल्गेरियाचा डिमिट्रोव्ह, रशियाचा मेदव्हेदेव, महिलांच्या विभागात पोलंडची टॉप सिडेड स्वायटेक, रायबाकिना, साबालेंका, कोको गॉफ यांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. जपानच्या नाओमी ओसाका, हॉलंडची रुस, जपानची युचीजिमा, फ्रान्सची डायना पेरी यांचे आव्हान संपुष्टात आले. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील झालेल्या सामन्यात द्वितीय मानांकित सिनरने फ्रांसच्या रिचर्ड गॅस्केटचा 6-4, 6-2, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत तिसरी फेरी गाठली. फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत शेवटच्या 32 खेळाडूंमध्ये प्रवेश करण्याची सिनरची ही चौथी वेळ आहे. 2002 साली फ्रान्सच्या गॅस्केटने आंतरराष्ट्रीय टेनिसमधील आपले पदार्पण फ्रेंच टेनिस स्पर्धेत केले होते. सिनेरने यापूर्वी ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली आहे. 2015 साली फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या स्विसच्या वावरिंकाचा पराभव करणारा पॅव्हेल कोटोव्हशी सिनरचा तिसऱ्या फेरीचा सामना होईल. दुसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात बल्गेरियाच्या 10 व्या मानांकित ग्रिगोर डिमीट्रोव्हने फॅबियन मॅरोझसेनचा 6-0, 6-3, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत तिसरी फेरी गाठली. रशियाच्या पाचव्या मानांकित डॅनिल मेदव्हेदेवने एकेरीची तिसरी फेरी गाठली आहे. दुसऱ्या फेरीतील लढतीत त्याचा प्रतिस्पर्धी केमॅनोव्हीकने दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडल्याने मेदव्हेदेवने ही लढत 6-1, 5-0 अशी जिंकली.

Advertisement

महिलांच्या विभागातील दुसऱ्या फेरीच्या सामन्यात पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकने जपानच्या नाओमी ओसाकेचे आव्हान 7-6 (7-1), 1-6, 7-5 अशा सेट्समध्ये संपुष्टात आणत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. स्वायटेक आणि ओसाका यांनी यापूर्वी प्रत्येकी 4 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहे. स्वायटेकने आता या टेनिस कोर्टवर सलग 16 सामने जिंकून आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. या स्पर्धेत बुधवारी वारंवार पावसाचा अडथळा आल्याने केवळ 9 सामने निकाली झाले. या विविध सामन्यामध्ये अमेरिकेची कोको गॉफ, ट्युनेशियाची ऑन्स जेबॉर, सोफिया केनिन, कार्लोस अल्कारेझ, ग्रीसचा सित्सिपस आणि रशियाचा रुबलेव्ह यांनी विजय मिळविले आहेत. दुसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात चौथ्या मानांकित इलिना रायबाकिनाने हॉलंडच्या अरांत्झा रुसचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत तिसरी फेरी गाठली. कझाकस्तानच्या 24 वर्षीय रायबाकिनाने या लढतीतील पहिला सेट 35 मिनिटात जिंकला. दुसऱ्या एका सामन्यात द्वितीय मानांकित आर्यना साबालेंकाने जपानच्या मोयुका युचीजिमावर 6-2, 6-2 अशी मात करत तिसरी फेरी गाठली. साबालेंकाने या सामन्यात आपल्या वेगवान आणि अचूक सर्व्हिस तसेच जमिनी लगतच्या फटक्यांचे शानदार दर्शन घडविले. अमेरिकेच्या कोको गॉफने स्लोव्हेनियाच्या टॅमेरा झिदान्सेकचा 6-3, 6-4 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. युक्रेनच्या 15 व्या मानांकित स्विटोलिनाने फ्रांसच्या डायना पेरीचा 6-4, 7-6 (7-3) असा फडशा पाडत तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला.

Advertisement
Tags :

.