शिराळ्यात झुलते हायमॅक्स पोल; नागरिक भयभीत
शिराळा :
शिराळा शहरातील आयटीआय चौक व नवीन कापरी नाका येथे बसवण्यात आलेले हायमॅक्स पोल नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहेत. निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने हे पोल झुलत्या झोपाळ्याप्रमाणे हलत असून, वाहनधारक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कामाची स्थिती पाहता, नगरपंचायतीने सदर काम जबाबदारीने स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
सदर प्रकल्प खासदार धैर्यशील माने यांच्या निधीतून तीन वर्षांपूर्वी मंजूर झाला होता. नागरिकांच्या सुरक्षेसाठी व रस्त्यावरील प्रकाश व्यवस्था सुधारण्यासाठी हायमॅक्स बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि, दोन दिवसांत पूर्ण होणारे हे काम सुरू करायला ठेकेदाराने तब्बल अडीच वर्षे घेतली.
हायमॅक्सच्या डांबावर सहा हॅलोजन लावण्याचे नियोजन होते; मात्र प्रत्यक्षात केवळ तीनच हॅलोजन बसवण्यात आले आहेत. शिवाय फिटींगही चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे लाईट वार्याच्या झोतामुळे झुलत्या पाळण्याप्रमाणे हलतात, जे अतिशय धोकादायक आहे.
या परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या असून, योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणीही केली आहे. नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "सदरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, जोपर्यंत ते योग्य व दर्जेदार पद्धतीने पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे काम प्रशासनाकडे स्वीकारण्यात येणार नाही."