‘स्वयंपूर्ण गोवा’ उपक्रम देशासाठी आदर्शवत!
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ पणजी, सांखळी
उपलब्ध संसाधने आणि अधिकाऱ्यांच्या क्षमतेचा वापर करत आपण स्वप्रदेशाला कशा प्रकारे समृद्ध करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘स्वयंपूर्ण गोवा’ होय. भविष्यात हा उपक्रम देशाला दिशादर्शक ठरणार आहे. त्यामुळे अन्य राज्यांनीही याच धर्तीवर स्वयंपूर्ण होण्याचा विचार करावा, असे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले.
आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत गोव्यातील कृषी व ग्रामीण विकास योजनांच्या लाभार्थ्यांना आभासी पद्धतीने संबोधित करताना ते बोलत होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास राज्यातील स्वयंपूर्ण मित्र, नियोजन व सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना, कृषी खात्याचे संचालक संदीप, विविध पालिका-पंचायतींची मंडळे, बचत गटांचे प्रतिनिधी, शेतकरी, कृषी विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यात शेतीची स्थिती चांगली आहे. खतांच्या अतिवापरामुळे शेतीची सुपीकता नष्ट झाली असल्याने आता सेंद्रीय शेतीकडे वळणे ही काळाची गरज बनली आहे. तसेच केवळ स्वत:पुरतीच शेती करण्यापेक्षा गावातील लोकांनी एकत्र येऊन गटांच्या माध्यमातून शेती केल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात होईल. त्याद्वारे महिलांना देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यात मदत होईल, असे मंत्री चौहान म्हणाले.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, खाजन शेतीचे व्यवस्थापन, कृषी पर्यटनाला चालना देणे, यासारखे अनेक उपक्रम गोवा सरकारने राबविले आहेत. हे खरोखरच कौतुकास्पद आहे, असे चौहान म्हणाले. त्याचबरोबर गोव्यात खाद्यप्रदूषणाची एकही घटना घडलेली नाही, ही उल्लेखनीय बाब आहे. गोव्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. त्यामुळे पर्यटनाच्या अनुषंगाने हरित पर्यटनाला चालना देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सरकारने घेतलेला पर्यटनाला चालना देण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे, असेही चौहान यांनी सांगितले.
केवळ गोव्याचीच नव्हे तर देशाची सेवा
स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे निर्माता असून संपूर्ण देशाला त्यांनी एक उत्कृष्ट दिशा दाखवली आहे. आपल्याकडे असलेल्या संसाधनाचा योग्य वापर करून व अधिकारी, जनतेमध्ये प्रेरणा निर्माण करून कशाप्रकारे आपले जीवन स्वयंपूर्ण करायचे याचा चांगला धडा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी घातला आहे. या संकल्पनेची स्तुती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केली असून इतरही राज्यांना या संकल्पनेतून प्रेरणा घेण्याचे आवाहन कृषीमंत्री चौहान यांनी केले. स्वयंपूर्ण गोवा या माध्यमातून डॉ. सावंत यांनी केवळ गोव्याचीच नव्हे तर देशाची सेवा केली आहे, असे ते पुढे म्हणाले.
विक्रमी संख्येने ‘लखपती दीदी’ तयार करणार : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना, केंद्रीय मंत्र्यांनी कृषी कर्जावरील व्याज सवलतीच्या केंद्रीय योजनेला पूरक म्हणून अंतर्गत लाभ वाढवून प्रभावीपणे शेती कर्ज व्याजमुक्त करण्याच्या गोवा सरकारच्या पुढाकाराची कबुली दिली आहे, असे सांगितले. ‘स्वयंपूर्ण गोवा’ मिशन अंतर्गत सरकार राज्यात विक्रमी संख्येने ‘लखपती दीदी’ तयार करण्याच्या प्रयत्नात असून केंद्र सरकारचे सतत मार्गदर्शन आणि पाठबळ, तसेच सरकारची गुंतवणूक आणि सर्व भागधारकांचे सहकार्य, सहभाग आणि कृषी व ग्रामीण विकासावर अधिक लक्ष केंद्रित केल्याने आपल्याला स्वावलंबी, समृद्ध गोवा ध्येयाच्या दिशेने नेले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमादरम्यान गोव्याच्या ‘लखपती दीदी’ ठरलेल्या स्नेहा नाईक व राणीया नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.