मानसी पारेखसोबत झळकणार स्वप्नील
गुजरात चित्रपटसृष्टीत करणार पदार्पण
मराठी चित्रपटसृष्टीचा मितवा म्हणून स्वप्नील जोशीला ओळखलं जातं. दुनियादारी, तू ही रे, मितवा, प्यारवाली लव्हस्टोरी, वाळवी यासारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. मराठी मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा तिन्ही माध्यमांमध्ये स्वत:च्या अभिनयाचा ठसा उमटविणार स्वप्नील आता लवकरच गुजराती चित्रपटात झळकणार आहे.
त्याच्या पहिल्या गुजराती चित्रपटाचं नाव ‘शुभचिंतक’ आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री मानसी पारेख मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची निर्मिती पार्थिव गोहिल आणि मानसी पारेख यांच्याकडुनच केली जात आहे. यापूर्वी गोलकेरी, कच्छ एक्स्प्रेस आणि झामकुडी या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. तर शुभचिंतक या चित्रपटाचे दिग्दर्शन निसर्ग वैद्य करणार आहे. हा एक डार्क कॉमेडी थ्रिलर स्वरुपाचा चित्रपट असणार आहे.
गुजराती चित्रपटसृष्टी मागील काही काळात वेगाने विकसित होत आहे. वैविध्यपूर्ण विषयांची मांडणी गुजराती चित्रपटांमध्ये करण्यात येत आहे. गुजराती चित्रपटसृष्टीत काहीतरी वेगळं करायला मिळतंय याचा मला आनंद आहे. मानसीसोबत काम करण्याची माझी इच्छा पूर्ण होत आहे असे उद्गार स्वप्नीलने काढले आहेत. स्वप्नील या चित्रपटात काम करण्यास तयार झाल्याने आम्हा सगळ्यांना आनंद झाला आहे. स्वप्नीलसोबत पडद्यावर झळकण्यासाठी मी उत्सुक असल्याचे मानसी म्हणाली.