कोल्हापूरच्या स्वप्निलचा अचूक नेम
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मी रायफल 3 पोझिशन प्रकारात अंतिम फेरीत : नेमबाजीत भारताला आणखी एका पदकाची आशा
वृत्तसंस्था/ पॅरिस
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत मनू भाकरने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर दोन कांस्यपदके जिंकली आहेत. आता आणखी एका नेमबाजाने भारताच्या पदकाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूरचा रहिवासी असलेल्या स्वप्निल कुसाळेने बुधवारी 50 मी रायफल 3 पोझिशन प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. स्वप्निलने पात्रता फेरीत 590 गुण मिळवून सातवे स्थान पटकावले. स्वप्निल आज (1 ऑगस्ट) पदकासाठी खेळणार आहे. हा सामना गुरुवारी दुपारी 1 वाजता होईल. पुरुषांच्या 50 मी रायफल 3 पोझिशन प्रकाराची बुधवारी पात्रता फेरी झाली. या प्रकारात भारताचे स्वप्निल कुसाळे व ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर हे दोघे सहभागी झाले होते. पात्रता फेरीत स्वप्निलने 590 गुणासह सातवे स्थान मिळवले. अखेरच्या क्षणी अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी त्याला फ्रान्सच्या रोमेन, झेक प्रजासत्ताकच्या जिरी प्रिरास्की यांच्याकडून आव्हान मिळाले. शेवटच्या क्षणी जिरी पिछाडीवर पडला व त्याला आठवे स्थान मिळाले. स्वप्निल सातव्या स्थानी राहिला. दुसरीकडे, ऐश्वर्य प्रतापकडून अपेक्षित अशी कामगिरी झाली नाही. ऐश्वर्यने देखील सुरुवात चांगली केली होती पण शेवटच्या स्टेजला तो पिछाडीवर पडला. 589 गुणासह तो 11 व्या स्थानी राहिला. दरम्यान, पात्रता फेरीत चीनचा लियू युकुन 594 गुणांसह अव्वल स्थानावर राहिला, जो ऑलिम्पिक पात्रतेचा विक्रम आहे. नॉर्वेचा हेग 593 गुणासह दुसऱ्या, युक्रेनचा कुलिश 592 गुणासह तिसऱ्या स्थानी राहिला.
स्वप्निलकडून पदकाची अपेक्षा
स्वप्निल आज (गुरुवार, 1 ऑगस्ट) अंतिम फेरीत खेळणार आहे. दुपारी 1 वाजता अंतिम फेरीला सुरुवात होईल. विशेष म्हणजे, या स्पर्धेत नेमबाजाला तीन पोजिशन्समध्ये नेम साधावा लागतो. यामध्ये गुडघ्यावर बसून नेम साधणे, पोटावर झोपून निशाणा साधणे आणि उभा राहून निशाणा साधायचा असतो. पात्रता फेरीतील अव्वल आठ नेमबाज अंतिम फेरीत पोहोचले असून आज या प्रकारात स्वप्निल भारताला तिसरे पदक मिळवून देणार का, याची तमाम क्रीडाप्रेमींना उत्सुकता लागली आहे.
मेहनतीच्या जोरावर ऑलिम्पिकपर्यंत मजल
50 मी रायफ्रल 3 पोझिशन प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणारा स्वप्निल सुरेश कुसाळे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचा रहिवासी आहे. स्वप्निल सध्या मध्य रेल्वेच्या पुणे परिमंडळात कार्यरत आहे. कांबळवाडीसारख्या छोट्या गावातून आलेल्या स्वप्निलने अफाट मेहनतीच्या जोरावर ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली आहे. नेमबाजी हा तसा महागडा खेळ. यासाठी लागणारी रायफलही तशी महाग. पेशाने शिक्षक असलेल्या स्वप्निलच्या वडिलांनी मात्र त्याची आवड जोपासली. सरावासाठी त्याला पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीत दाखल केले. यानंतर खऱ्या अर्थाने स्वप्निलचा प्रवास सुरु झाला. आजवर त्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदके जिंकली आहेत. 2022 मध्ये इजिप्तमधील स्पर्धेत शानदार कामगिरी करत ऑलिम्पिक कोटा मिळवला होता. आता, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवण्यासाठी तो प्रयत्नशील असणार आहे.
रेल्वेकडून शुभेच्छा
बुधवारी स्वप्निल कुसाळेने शानदार कामगिरी करत 50 मी रायफल 3 पोझिशन प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. मध्य रेल्वे व भारतीय रेल्वेसाठी ही अभिमानास्पद बाब असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव यांनी म्हटले आहे.
लक्ष्य सेन, सिंधूचा तुफानी खेळ
ऑलिम्पिकमध्ये भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू व लक्ष्य सेन यांनी धडाकेबाज विजयासह पुढील फेरीत प्रवेश केला आहे. बुधवारी झालेल्या महिला एकेरीच्या सामन्यात सिंधूने एस्टोनियाच्या क्रिस्टन कुबाचा 21-5, 21-10 असा धुव्वा उडवला. सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या सिंधूने प्रतिस्पर्धीला क्रिस्टनला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. दरम्यान, सिंधूचा पुढील सामना चीनच्या सहाव्या मानांकित ही बिंग जिओशी होईल.
दुसरीकडे पुरुषांच्या एकेरी सामन्यात युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने इंडोनेशियाचा दिग्गज खेळाडू जोनाथन ख्रिस्टीला 21-18, 21-12 असा पराभवाचा धक्का दिला. 28 मिनिटे चाललेल्या या लढतीत लक्ष्यने सुरेख खेळ साकारला. अव्वल मानांकित खेळाडूंविरुद्ध खेळताना त्याने दडपणाखाली न खेळता हा सामना जिंकला. लक्ष्यचे हे पहिले ऑलिम्पिक आहे.