महाराष्ट्र संघाच्या व्हिडीओ अॅनॅलीस्टची जबाबदारी स्वप्नील कदमकडे
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून घोषणा
कोल्हापूर
भारतीय क्रिकेट नियामक बोर्डच्यावतीने (बीसीसीआय) घेण्यात येणाऱ्या विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसह रणजी क्रिकेट स्पर्धेतील सहभागी महाराष्ट्र संघाचे व्हिडीओ अॅनॅलीस्ट म्हणून कोल्हापुरातील क्रिकेट जाणकार स्वप्नील कदम यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून (एमसीए) स्वप्नील यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील महाराष्ट्र संघाचे सामने मुंबईतील बीकेसी स्टेडियम, वानखडे स्टेडियम व डी. वाय. पाटील स्टेडियमवर 21 डिसेबंर ते 5 जानेवारी 2025 या दरम्यान होणार आहेत. राजस्थान, सेनादल, मेघालय, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, आंध्रप्रदेश, रेल्वे या संघांविऊद्ध महाराष्ट्र संघाच्या लढती होतील. तसेच महाराष्ट्र रणजी संघाचा पहिला सामना 23 ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत नाशिक येथे बडोदा संघाविऊद्ध तर 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 दरम्यान सोलापूर येथे त्रिपुरा संघाविऊद्ध दुसरा सामना होणार आहे. वरील सर्वच सामन्यांमध्ये स्वप्नील कदम हे महाराष्ट्र संघाचे व्हिडीओ अॅनॅलीस्ट म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. स्वप्नील कदम हे गेली 10 ते 12 वर्षे कोल्हापूर व पुणे येथे झालेल्या विविध क्रिकेट स्पर्धांमधील सामन्यात स्कोरींगचे काम करत आहेत. गेल्या वर्षापासून ते महाराष्ट्र रणजी संघासह महाराष्ट्र 23 वर्षाखालील मुलांच्या संघाचे व्हिडीओ अॅनॅलीस्ट म्हणून काम करत आहेत.