स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांना वडगाव पोलिसांनी घेतले ताब्यात!
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे आठशे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीसा
पेठ वडगाव/प्रतिनिधी
महाराष्ट्राचे राज्यपाल व देशाचे गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा असून या दौऱ्यात त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निर्णय घेतलेला आहे.यामुळे स्वाभिमानी पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे व पदाधिकारी शिवाजी आंबेकर,शरद पाटील यांना वडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले.
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=Ht5pSkOxA4M[/embedyt]
गत वर्षीच्या ऊस हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे प्रति टन शंभर रुपये साखर कारखानदार देणे लागतात याबाबत शासनाने योग्य ते आदेश अद्याप पर्यंत साखर कारखान्यांना दिलेले नाहीत.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व राज्याचे मुख्य सचिव यांचे बरोबर चर्चा झाली होती. मात्र याबाबत साखर कारखान्यांना कोणताही आदेश दिलेला नाही. याचबरोबर यावर्षी वारणा, पंचगंगा,कृष्णा व इतर नद्यांना पूर आला होता या पुराचे पाणी येऊन शेतामध्ये बरेच दिवस म्हणजे बारा ते पंधरा दिवस पुराचे पाणी साठून राहिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. याबाबतही महाराष्ट्र सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. याचा निषेध म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना संघटनेतर्फे काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय घेतला होता.
हे आंदोलन स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी करू नये यासाठी पोलिसांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे आठशे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल करण्याच्या नोटीसा बजावल्या असून स्वाभिमानी पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांना व अन्य कार्यकर्त्यांना वडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. विविध तालुक्यातही अन्य शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान स्वाभिमानीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक करून पोलिसांनी दडपशाही केल्याच्या निषेध स्वाभिमानीचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला असून कोणत्याही परिस्थितीत राज्यपालांना काळे झेंडे दाखवणारच असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.