For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्विटोलिना, स्वायटेक, किनवेन, साबालेन्का उपांत्यपूर्व फेरीत

06:56 AM Jun 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
स्विटोलिना  स्वायटेक  किनवेन  साबालेन्का उपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

अल्कारेझ, टॉमी पॉल, मुसेटी, टायफो यांचीही आगेकूच, पाओलिनी, रायबाकिना, रुने, शेल्टन स्पर्धेबाहेर

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

स्पेनच्या विद्यमान विजेत्या कार्लोस अल्कारेझने बेन शेल्टनविरुद्धच्या सामना जिंकत प्रेंच ओपन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठल असली तरी त्याने दुसऱ्या सेटमधील एका गुणावेळी खिलाडुवृत्ती दाखविल्याने त्याचे सर्वांनीच कौतुक केले. इलिना स्विटोलिना, इगा स्वायटेक, एरिना साबालेन्का, झेंग किनवेन, टॉमी पॉल, फ्रान्सेस्को टायफो, लॉरेन्झो मुसेटी यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली. रायबाकिना, जस्मिन पाओलिनी, बेन शेल्टन, होल्गर रुने यांचे आव्हान संपुष्टात आले.

Advertisement

द्वितीय मानांकित अल्कारेझने अमेरिकेच्या 13 व्या मानांकित बेन शेल्टनवर 7-6 (10-8), 6-3, 4-6, 6-4 अशी मात करीत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. या सामन्याच्या दुसऱ्या सेटवेळी शेल्टनने मारलेला पासिंग शॉट अल्कारेझच्या आवाक्याबाहेर होता. त्यावेळी त्याने चेंडूच्या दिशेने रॅकेट फेकली. चेंडूला रॅकेट लागल्याने तो परत शेल्टनच्या बाजूला गेला. यावेळी अल्कारेझला गुण देण्यात आला. पण थोडा विचार केल्यानंतर तो पंचांकडे गेला आणि आपण परतीचा फटका मारला तेव्हा रॅकेट हातात नव्हती, असे स्पष्ट केले. त्याच्या सांगण्यावरून पंचांनी हा गुण शेल्टनला बहाल केला. पंचांनी जेव्हा ही गोष्ट प्रेक्षकांना सांगितली, तेव्हा सर्वांनी अल्कारेझच्या खिलाडुवृत्तीचे टाळ्या वाजवून कौतुक केले. अल्कारेझची पुढील लढत 12 व्या मानांकित टॉमी पॉलशी होईल. पॉलने ऑस्ट्रेलियाच्या 25 व्या मानांकित अॅलेक्सी पापीरिनचा 6-3, 6-3, 6-3 असा पराभव केला. 15 व्या मानांकित अमेरिकेच्या टायफोने जर्मनीच्या डॅनियल अल्टमायरवर 6-3, 6-4, 7-6 (7-4) अशी मात केली. इटलीच्या आठव्या मानांकित लॉरेन्झो मुसेटीने 10 व्या मानांकित डेन्मार्कच्या होल्गर रुनेला 7-5, 3-6, 6-3, 6-2 असा पराभवाचा धक्का देत आगेकूच केली. सव्वातीन तास ही लढत रंगली होती.

स्विटोलिना, साबालेन्का, झेंग विजयी

महिला एकेरीत 13 व्या मानांकित युक्रेनच्या इलिना स्विटोलिनाने तीन मॅच पॉईंट्स वाचवत आणि एका सेटची पिछाडी भरून काढत 2024 ची उपविजेती जस्मिन पाओलिनीचे आव्हान 4-6, 7-6 (8-6), 6-1 असे संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पाचव्यांदा तिने या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मात्र यापूर्वी चार वेळा यापुढे मजल मारता आलेली नाही. तिची पुढील लढत पोलंडच्या इगा स्वायटेकशी होईल. स्वायटेकने माजी विम्बल्डन चॅम्पियन इलेना रायबाकिनाचा 1-6, 6-3, 7-5 असा पराभव केला. एरीना साबालेन्काने 16 व्या मानांकित अमांदा सिनियाकोव्हाचा 7-5, 6-3 तर झेंग किनवेनने 19 व्या मानांकित ल्युडमिला सॅमसोनोव्हावर 7-6 (7-5), 1-6, 6-3 अशी मात केली. उपांत्यपूर्व फेरीत साबालेन्का व किनवेन यांच्यात लढत होईल.

Advertisement

.