बारामुल्ला पोलीस चौकीवर संशयास्पद ग्रेनेड हल्ला
जम्मू-काश्मीर
जम्मू-कश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील ओल्ड टाऊन पोलीस चौकीजवळ संशयास्पद ग्रेनेड हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्याने सुरक्षेची चिंता निर्माण झाली. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्च रोजी रात्री ९.२० वाजता, पोलीस चौकीच्या मागील बाजूने स्फोटाचा आवाज ऐकू आला. यानंतर तातडीने सुरक्षा पथकं घटनास्थळी तैनात करण्यात आली. इतर सुरक्षा यंत्रणांशी संपर्क साधून पोलीस पथकांनी या परिसराला त्वरीत वेढा घालून शोध मोहीम सुरू केली. या तपासणी दरम्यान रात्री १०.४० वाजता, सुरक्षा कर्मचाऱ्यांना पोलीस चौकीच्या सुरक्षा भिंतीजवळ एक ग्रेनेड पिन सापडली. यानंतर स्फोटक फेकल्याचा संशय वर्तविला जात आहे.
पोलीस चौकीच्या आवारातच स्फोट झाला. पण तो ग्रेनेड अशा भागात पडला होता, ती जागा निर्मनुष्य होती. या स्फोटात कोणालाही दुखापत झालेली नाही. याशिवाय स्फोटाच्या ठिकाणी खड्डा देखील पडला नसल्याची माहिती सांगण्यात येत आहे. या घटनेचा अधिका तपास सुरू करण्यात आला आहे. हल्ल्यामागील लोकांची ओळख पटविण्यासाठी परिसरात आणि आसपास शोध मोहीम सुरू आहे. दरम्यान, बारामुल्ला पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती जवळच्या पोलीस युनिटला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.