भारतीय दांपत्याचा संशयास्पद मृत्यू
वृत्तसंस्था / ओटावा
कॅनडाच्या आंटोरिओ या शहरात एका घराला लागलेल्या संशयास्पद आगीत भारतीय वंशाचे पतीपत्नी आणि त्यांची तरुण कन्या यांचा जळून मृत्यू झाला आहे. ही घटना 7 मार्च 2024 या दिवशी घडली होती. या घटनेची चौकशी केली जात आहे, असे कॅनडाच्या पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आगीत या कुटुंबाचे घर पूर्णत: जळून गेले. शहराच्या सुरक्षित स्थानी ही आग अचानक कशी लागली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. राजीव वारीकू (वय 51), त्यांची 47 वर्षीय पत्नी शिल्पा आणि 16 वर्षांची कन्या मेहक या तिघांचाही मृत्यू झाला आहे.
राजीव वारिकू हे आंटोरिओ विभागाच्या प्रशासकीय आरोग्य सेवेत उच्च पदावर नोकरी करत होते. त्यांच्या घराला लागलेली आग नैसर्गिक नव्हती, असे तेथील पोलिसांनी मान्य केले आहे. त्यामुळे या कुटुंबाची हत्या झाली असावी, असे समजून पुढील तपास केला जात आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून धागेदोरे मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कुटुंबाच्या भारतातील संबंधितांना आणि कॅनडातील भारतीय दूतावासाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारने या संदर्भात सर्व साहाय्य केले जाईल, असे स्पष्ट केले आहे.