झारखंडमध्ये कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू
वृत्तसंस्था/ दुमका
झारखंडमधील दुमका जिह्यातील हंसडीहा पोलीस स्टेशन हद्दीतील बर्देही गावात संशयास्पद परिस्थितीत एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली. ही सामूहिक हत्या किंवा आत्महत्येची घटना असू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. रविवारी सकाळी गावकऱ्यांना शेतात एका तरुणाचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांनी येऊन घराची झडती घेतली असता आत एक महिला आणि दोन मुलांचे मृतदेह आढळले. तिघांच्याही गळ्यात दोरी बांधलेली आढळली. मृतांमध्ये विरेंद्र मांझी (32), त्यांची पत्नी आरती कुमारी (28) आणि रोही (5) आणि विराज (3) ही दोन लहान मुले आहेत. प्राथमिक तपासानुसार, विरेंद्रने रात्री उशिरा पत्नी आणि मुलांचा गळा दाबून हत्या केली, नंतर त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. दुमका पोलीस अधीक्षक पितांबर सिंह खेरवार यांनी या घटनेच्या तपासासाठी विशेष पथक नियुक्त केले आहे.