उद्योजकाचा संशयास्पद मृत्यू
जैनापूरनजीकची घटना : कारही बेचिराख : कुटुंबियांकडून घातपाताचा संशय
प्रतिनिधी/ चिकोडी
संकेश्वर-जेवर्गी राज्य महामार्गाजवळ चिकोडीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या जैनापूर गावाच्या हद्दीत राज्य महामार्गानजीक चिकोडीच्या एका प्रसिद्ध ग्रेनाईट उद्योजकाचा कारमध्ये जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. चिकोडी येथील मुला प्लॉटमधील रहिवासी व ग्रेनाईट व्यापारी फिरोज सुल्तानसाब बडगावी (वय-33) यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात असून सीओडी चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, अत्यंत मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या या राज्य महामार्गालगतच कार व्यवस्थितपणे लावलेली असून या कारच्या चालकाच्या ठिकाणी सदर व्यापारी बसलेल्या अवस्थेत कार जळाली आहे. चालकाच्या सीटवर बसलेल्या फिरोज बडगावी याचा मृतदेह पूर्णपणे जळाला असून केवळ काही हाडांचे अवशेष उरले आहेत. या घटनेबाबत कुटुंबियांनीही घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
सदर घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. जाणून-बुजून कारला महामार्गाच्या बाजूला नेऊन आग लावून परस्पर कारला आग लावल्याचा संशय व्यक्त होत आहे. बुधवारी दुपारी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीजच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन कारची तपासणी केली. घटनास्थळी चिकोडी पोलीस ठाण्याचे उपाधीक्षक गोपाळकृष्ण गौडर यांच्यासह पोलिसांनी भेट दिली. तसेच विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी अशा वारंवार घटना घडत असून पोलिसांच्या तपास कार्यामध्ये गती येणे आवश्यक आहे. तातडीने तपास करावा अन्यता पत्र लिहून सीओडी तपासणीसाठी शिफारस करण्यात यावी, अशी मागणी केली.
फिरोज बडगावी हे मुल्ला प्लॉट येथील रहिवासी असून बाळंतीनकोडी रोडलगत त्यांचे ग्रेनाईटचे मोठे दुकान आहे. अलिकडे ते समाजकार्यात सहभागी होत होते. त्यांचे वडील हेस्कॉमचे नोंदणीकृत ठेकेदार होते. तर त्यांचे बंधू हेस्कॉममध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंते आहेत. फिरोजच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.