सांबरा येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू
गळफास घेतल्याने सिव्हिलला नेताना मृत्यू
प्रतिनिधी/ बेळगाव
सांबरा येथील एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली असून रात्री उशिरापर्यंत मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्या विवाहितेच्या माहेरवासियांनी मात्र सासरच्या मंडळींविरुद्ध आरोप केला आहे.
सविता मारुती जोगाणी (वय 32) रा. महात्मा फुले गल्ली, सांबरा असे त्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. शनिवार दि. 28 डिसेंबर रोजी गळफास घेतलेल्या अवस्थेत ती आढळून आली आहे. सविताचा पती मारुती खासगी फायनान्समध्ये काम करतो. तो दुपारी जेवणासाठी घरी आला होता. त्यावेळी दरवाजाला आतून कडी होती. सातत्याने दरवाजा ठोठावूनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून शेजाऱ्यांना बोलावून दरवाजा फोडून घरात प्रवेश करण्यात आला.
त्यावेळी सविताने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. लगेच तिला वाचविण्यासाठी दोरी कापून सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. तेथे पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सविताचे माहेर राकसकोप येथील असून माहेरच्या मंडळींना या घटनेची माहिती समजताच ते सिव्हिल हॉस्पिटलला दाखल झाले.
घटनेची माहिती समजताच मारिहाळ पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी, उपनिरीक्षक मंजुनाथ नायक व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. सविताचा भाऊ प्रशांत गावडू मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सासरच्या मंडळींकडून तिचा छळ करण्यात येत होता. त्यांनीच तिचा घातपात केला आहे. सविताच्या पश्चात पती, एक मुलगी, आई, भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार सात वर्षांपूर्वी सविता व मारुती यांचे लग्न झाले आहे. सासरच्या मंडळींकडून तिचा छळ करण्यात येत होता. त्यामुळेच तिने आपला जीव गमावला आहे. यासंबंधी मारिहाळ पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद करण्यात येत आहे. रविवारी सविताच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.