केरळमध्ये 19 वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू
प्रियकरासह अनेक जण ताब्यात
वृत्तसंस्था/ मलयट्टूर
केरळ पोलिसांनी मलयट्टूरमध्ये एका 19 वर्षीय युवतीच्या रहस्यमय मृत्यूप्रकरणाच्या तपासाला वेग दिला आहे. बेंगळूरू येथे शिकणारी चित्रप्रिया नावाची विद्यार्थिनी शनिवार संध्याकाळपासून घरातून बेपत्ता झाली होती. 4 दिवसांनी मंगळवारी तिचा मृतदेह घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर एका शेतात सडलेल्या अवस्थेत मिळाला होता.
याप्रकरणी चित्रप्रियाच्या प्रियकरासह अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच उत्तरीय तपासणी सुरू होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सर्वप्रथम मृतदेहाची ओळख पटविणे आवश्यक आहे, मिळालेला मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता आणि आम्ही कपड्यांच्या आधारावर हा मृतदेह चित्रप्रियाचा असू शकतो असा अनुमान लावला आहे. हत्येची पुष्टी उत्तरीय तपासणीद्वारेच होणार आहे. सध्या अनैसर्गिक मृत्यू म्हणून प्रकरण नोंद करण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्याने सांगितले आहे.