Solapur Crime : सोलापूरमध्ये पत्नीचा चारित्र्यावर संशय; चाकूने निर्घृण खून
चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पती पोलिसात हजर
सोलापूर : चारित्र्याचा संशय घेत झालेल्या भांडणात पत्नीचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना मंगळवार, १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास शहरातील न्यू बुधवार पेठ, आंबेडकर नगर येथे घडली. खुनानंतर पती स्वतःहून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने खून केल्याची कबुली दिली.
यशोदा सुहास सिध्दगणेश (वय-३५. रा. न्यू बुधवार पेठ, आंबेडकर नगर सोलापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सुहास तुकाराम सिद्धगणेश असे खून केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.
याप्रकरणी मृत यशोदा हिची मावशी श्रीमती अन्नपूर्णा नीलकंठ बाळशंकर (वय-५०, रा. रमाबाई आंबेडकर नगर न्यू बुधवार पेठ, सोलापूर) यांनी आरोपींविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मृत यशोदा सिद्धगणेश व तिची मुलगी सौंदर्या अशा दोघेजणी राहत होत्या. यशोदा ही सोलापूर शहरातील कस्तुरबा मार्केट येथे कांदा विक्रीचा व्यवसाय करत होती. तर पती सुहास हा मार्केटयार्ड मध्ये कामाला होता. सुहास हा पत्नी यशोदा हिच्यावर चारित्र्याचा संशय घेत होता. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये नेहमी भांडण होत होते. हे दोघे गेल्या पाच महिन्यापूर्वी विभक्त झाले होते. तेव्हापासून दोघे वेगळे राहत होते.
सुहास हा त्याचा मोठा मुलगा वैभव व सून यांच्यासह तळव्हिप्परगा येथे राहत होते. तर यशोदा ही आपली मुलगी सौंदर्या हिव्यासोबत बुधबार पेठ अआंबेडकर नगर येथे राहत होती. मुलगी सौंदर्या ही शहरातील दयानंद महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
सोंदर्या ही सकाळी आईला सांगून कॉलेजला गेली. त्यानंतर आरोपी सुहास हा पत्नी यशोदा राहत असलेल्या घरी आला आणि त्याने चाकूने पत्नीच्या गळ्यावर तसेच पोटात व हातावर वार करून गंभीर जखमी केले. दरम्यान यशोदा हिच्या घरातून जोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने जवळच राहत असलेल्या फिर्यादी व मृत यशोदा हिची मावशी अन्नपूर्णा बाळशंकर या धावत घटनास्थळी आल्या. त्यांनी यशोदा हिच्या घरात येऊन डोकावून पाहिले असता यशोदा ही लोखंडी बेडजवळ जमिनीवर खाली पडलेली दिसली.
दरम्यान सुहास हा त्याच्या हातातील चाकूने यशोदाच्या पोटात व गळ्यावर वार करत होता. यावेळी फिर्यादी या आरडा ओरडा करून यशोदाजवळ जात असताना सुहास याने आमच्यामध्ये कोणी आला तर मी सर्वांना खल्लास करून टाकीन, अशी धमकी देऊन तेथून निघून गेला. त्यानंतर फिर्यादी व इतर नागरिकांनी जखमी यशोदाला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले. डॉक्टरांनी यशोदा हिला तपासून पाहिले असता ती मृत झाल्याचे सांगितले.