For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवारीबाबत ‘सस्पेंस’

10:44 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवारीबाबत ‘सस्पेंस’
Advertisement

तिसऱ्या यादीतही नाही उमेदवाराचे नाव

Advertisement

पणजी : भारतीय जनता पार्टीने गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी आपली तिसरी यादी जाहीर केली, मात्र त्यात गोव्याच्या दक्षिण गोवा उमेदवाराचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे दक्षिण गोव्याच्या उमेदवारीबाबत ‘सस्पेंस’ आणखी वाढले आहे. भाजपच्या राष्ट्रीय समितीने महिला उमेदवार द्यावा, अशी सूचना केली परंतु, गोव्यातील स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे आयत्यावेळी एखाद्या महिलेला उमेवार म्हणून उभे केल्यास भाजपला नुकसान होईल. त्यामुळे भाजपकडे असलेल्या इच्छुक नेत्यांपैकी नाव निश्चित करावे. भाजपने गुरुवारी आपली तिसरी यादी जाहीर केली त्यात दक्षिण भारतातील 9 उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. दक्षिण गोव्यासाठी एकूण 4 उमेदवारांच्या नावाची यादी पक्षेश्रेष्ठींना सादर केली असून त्यात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर आणि माजी आमदार दामू नाईक यांचा समावेश होता. त्यातील दिगंबर कामत यांना उमेदवार करण्याचा भाजपचा प्रयत्न होता मात्र त्यांनी उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिला. त्यातून पक्षश्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केली आणि गोव्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त असल्याने उमेदवारी रोखून धरली. मात्र उत्तर गोव्यातील उमेदवारी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना जाहीर केली. दक्षिण गोव्याची उमेदवारी गुरुवारी जाहीर होईल असे भाजपचे स्थानिक नेते सांगत होते. नवी दिल्लीत त्या अनुषंगाने निवडणूक समितीची बैठक झाली होती, मात्र त्यात तामिळनाडूतील उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली व गोव्याचे नाव जाहीर केले नाही. नवी दिल्लीत आज पुन्हा एकदा भाजपची निवडणूक समितीची बैठक होईल.

तानावडेंना विचारा : श्रीनिवास धेंपे

Advertisement

समाज माध्यमांवर उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांच्या पत्नी पल्लवी धेंपे यांना उमेदवारी देण्याची शक्यता कोणीतरी व्यक्त केली. यासंदर्भात धेंपे यांना विचारता ते म्हणाले की, उमेदवारीबाबत मला काही विचारु नका. प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनाच विचारा, असे उत्तरले. आपली पत्नी खरोखरच निवडणुकीत उतरणार काय? असे विचारता तिचा निर्णय ती घेईल. आपण याबाबत पूर्णत: अनभिज्ञ आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेसमध्ये अस्वस्थता

उमेदवारी प्रश्नावरुन काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरलेली आहे. काँग्रेस पक्षाने अद्याप उत्तर व दक्षिण गोव्यातील उमेदवार नक्की केलेले नाहीत. दररोज एकेक दिवस मागे पडतोय. काँग्रेस पक्षाचा प्रचार पूर्णत: बंद पडलेला आहे. या उलट भाजपने सर्वत्र जोरदार प्रचार सुरु केलेला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरलेली आहे.  पक्षाच्या कामात ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वीच पूर्णत: मरगळ आलेली आहे, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. भाजप जोपर्यंत दक्षिण गोव्याचा आपला उमेदवार जाहीर करीत नाही तोपर्यंत काँग्रेस आपला उमेदवार जाहीर करण्यास तयार नाही. यामुळे कार्यकर्त्यांची पूर्णत: गोची झाली आहे.

Advertisement
Tags :

.