For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेंगळुरात संशयित दहशतवादी गजाआड

06:23 AM Sep 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेंगळुरात संशयित दहशतवादी गजाआड
Advertisement

एनआयएची कारवाई : विदेशात फरार होण्याचा प्रयत्न विफल

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

बेंगळूरच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) विदेशात फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. अजीज अहमद उर्फ जलील अजीज अहमद असे त्याचे नाव आहे. तामिळनाडूतील हिझ्ब-उत-तहरीर प्रकरणातील तो संशयित आरोपी असल्याचे एनआयएने सांगितले आहे.

Advertisement

सदर संशयित दहशतवादी शुक्रवार 30 ऑगस्ट रोजी बेंगळूरच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सौदी एअरलाईन्स विमानातून सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे फरार होण्याच्या प्रयत्नात होता. याविषयी सुगावा लागल्याने एनआयएच्या पथकाने सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

दहशतवादी आणि इस्लामच्या कट्टरवादी विचारसरणीचा प्रभाव असलेल्या आणि इस्लामिक कायद्याची स्थापना करण्याच्या उद्देशाने कारवाया केल्याप्रकरणी एनआयएने यापूर्वी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हिझ्ब-उत-तहरीरचा संस्थापक ताकी अल-दिन-अल-नभानी याने लिहिलेली नियमावली भारतात जारी करण्याचा आरोपींचा उद्देश होता.

आरोपींनी अनेक युवकांना एकत्र करून त्यांच्या मनात हिझ्ब-उत-तहरीरची विचारसरणी रुजविण्यासाठी शिबिरे (बयान) आयोजित केली. त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी शत्रूसैन्याची मदत घेण्याचे प्रयत्न केले होते. अशी गुप्त शिबिरे आयोजिणाऱ्यांमध्ये अजीज अहमद हा प्रमुख आरोपी होता. युवकांना आपल्या जाळ्यात ओढून दहशतवादी कृत्यांमध्ये सामील करून घेण्याचे प्रयत्नही या संघटनेमार्फत झाल्याचे एनआयएच्या तपासातून उघडकीस आले होते.

एनआयएच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजीज अहमद बयान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुप्त सभा संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत होता. युवा आणि प्रभावी व्यक्तींच्या सहभागातून बयान सभेमध्ये ‘हिझ्ब-उत-तहरीर’ची विचारसरणी बिंबविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या प्रकरणात एनआयएने सहा आरोपींविरुद्ध देशाची सुरक्षा धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला होता.

Advertisement
Tags :

.