संशयित दहशतवाद्याला राजस्थानमध्ये अटक
‘टीटीपी’ संघटनेच्या सदस्यावर एटीएसची कारवाई : तरुणांना जिहादचे प्रशिक्षण दिल्याचेही उघड,ओसामाच्या चौकशीत धक्कादायक खुलासे
वृत्तसंस्था/जयपूर
दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दहशतवादी संघटना ‘टीटीपी’चा सक्रिय सदस्य मौलाना मोहम्मद ओसामा याला गुरुवारी राजस्थानमधून अटक केली. एटीएसने त्याच्यावर संशय घेत त्याच्या भावालाही अटक केली. दोघांनाही पाच दिवसांपूर्वी सांचोरमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून एटीएस पथकाने त्याची विदेशात पळून जाण्याची योजना यशस्वी होण्यापूर्वीच त्याला अटक केली. मौलाना मोहम्मद ओसामा याची अटक हे सुरक्षा यंत्रणांसाठी एक मोठे यश मानले जात आहे.
राजस्थान दहशतवादविरोधी पथकाने एक मोठा दहशतवादी कट उधळून लावत सांचोरचा धर्मगुरु मोहम्मद ओसामा उमर याला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत (यूएपीए) अटक केली. ओसामाचे थेट संबंध अफगाणिस्तानातील भयानक दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानशी (टीटीपी) असल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले आहे. तो दुबईमार्गे अफगाणिस्तानला पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच एटीएसने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
गेल्या शुक्रवारी एटीएसने राज्यातील चार वेगवेगळ्या जिह्यांमध्ये एकाचवेळी छापे टाकत पाच संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी दोघे भाऊ होते. जयपूर येथील एटीएस मुख्यालयात त्यांची चार दिवस चौकशी करण्यात आली. चौकशी आणि पुराव्यांच्या आधारे एटीएसने बुधवारी धर्मगुरु ओसामा उमरविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
मूळ बाडमेरचा रहिवासी
ओसामा उमर हा बाडमेरमधील मुस्नराई का बास येथील रहिवासी आहे. मागील काही वर्षे तो सांचोरमध्ये कट्टरतावाद पसरवत होता. एटीएसच्या तपासात उघड झाल्याप्रमाणे तो गेल्या चार वर्षांपासून इंटरनेट कॉलिंगद्वारे टीटीपीच्या वरिष्ठ कमांडरशी संपर्कात होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओसामा स्थानिक तरुणांना संघटनेशी जोडण्याचा प्रयत्न करत होता आणि अटक केलेल्या चार संशयितांवर दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी दबाव आणत होता. तथापि, प्राथमिक तपासात कोणत्याही निधी किंवा आर्थिक व्यवहाराची पुष्टी झालेली नाही.
चार जिह्यांमध्ये एकाचवेळी छापे
या प्रकरणासंदर्भात एटीएसने चार जिह्यांमध्ये एकाचवेळी छापे टाकत एकूण पाच संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. एटीएसचे पथक आता ओसामाच्या संपर्कात कोण होते आणि त्याच्या कारवायांमागे कोणत्या पातळीचे नेटवर्क आहे याचा तपास करत आहे. एटीएसने सध्या ओसामाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याच्याकडील डिजिटल उपकरणे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली आहेत. तपास संस्था आता या संपूर्ण नेटवर्कच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कनेक्शनची चौकशी करत आहेत.