बेंगळुरात संशयित दहशतवाद्याला अटक
बेंगळूर : आसाममधील गुवाहाटी येथे पाच ठिकाणी आयइडी बॉम्ब ठेवून बेंगळुरात आसरा घेतलेल्या संशयित दहशतवाद्याला एनआयएच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. गिरीश बोरा उर्फ गौतम असे त्याचे नाव आहे. तो उल्फा संघटनेतील संशयित दहशतवादी असून बेंगळूर ग्रामीण जिल्ह्यातील आनेकलच्या जिगनी येथे वास्तव्यास होता. ऑगस्ट महिन्यात गुवाहाटी येथे पाच ठिकाणी कच्चे बॉम्ब ठेवून गिरीश बोरा कुटुंबीयांसमवेत फरार झाला होता. बेंगळूरमधील जिगनी परिसरात भाडोत्री घर घेऊन तो वास्तव्यास होता. येथील एका खासगी कंपनीत गौतम या नावाने सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होता. गिरीश बोरा बेंगळुरात असल्याचा सुगावा लागताच आसामच्या एनआयए पथकाने बुधवारी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याजवळील मोबाईल आणि काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. स्थानिक न्यायालयात हजर करून एनआयए अधिकाऱ्यांनी त्याला आसामला नेले आहे.