जादूटोण्याचा संशय, परिवारालाच संपविले
केरळमध्ये दुहेरी हत्या प्रकरण
वृत्तसंस्था/ तिरुअंनतपुरम
केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील एनमारा शहरात दुहेरी हत्या प्रकरण घडले आहे. स्थानिक रहिवासी 55 वर्षीय के. सुधाकरन आणि त्यांची आई 75 वर्षीय लक्ष्मी यांची त्यांच्याच घरात क्रूरपणे चाकूने वार करत हत्या करण्यात आली. आरोपी त्यांचा शेजारी चेंथमारा असून तो पाच वर्षांपूर्वीच सुधाकरन यांची पत्नी सजिताच्या हत्येप्रकरणी जामिनावर बाहेर पडला होता. सुधाकरन यांच्या परिवाराच्या जादूटोण्यामुळे पत्नी आपल्याला सोडून गेल्याचा संशय चेंथमाराला होता. याचमुळे त्याने 2019 मध्ये सजिताची हत्या केली होती.
पोलिसांनी 36 तासांच्या शोधानंतर चेंथमाराला अटक केली आहे. या दुहेरी हत्येमुळे संतप्त जमावाने पोलीस स्थानकाबाहेर निदर्शने केली आहेत. सुधाकरन यांच्या मुली अखिला आणि अथुल्या या केवळ 5 वर्षांमध्ये आईवडिल अन् आजीला गमावल्याने हादरून गेल्या आहेत. 2019 मध्ये चेंथमाराने सुधाकरन यांच्या पत्नी सजिता यांची हत्या केली होती. काही वर्षांपर्यंत तुरुंगात राहिल्यावर तो जामिनावर बाहेर आला आणि नेनमारा येथील स्वत:च्या घरी परतला.
चेंथमाराला शेजारी राहू न देण्याची विनंती आम्ही पोलिसांना केली होती. परंतु पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक रहिवासी अन् सुधाकरन यांच्या मुलींनी केला आहे. सुधाकरन स्वत:च्या पत्नीच्या हत्येचा सूड घेण्यासाठी हल्ला करू शकतो असा संशय होता, यातूनच त्याची आणि त्याच्या आईची हत्या केल्याची कबुली चेंथमाराने दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे