पोक्सो प्रकरणातील संशयिताने पोलीस स्थानकात स्वत:ला पेटविले
जामिनावर असतानाही सोडला नाही हेका
बेळगाव : वडगाव येथील एका तरुणाने पोलीस स्थानकात पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुण पोक्सो प्रकरणातील संशयित आरोपी असल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवार दि. 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ही घटना घडली आहे. दोन वर्षांपूर्वी संभाजीनगर-वडगाव परिसरातील गोपाल (वय 24) नामक एका तरुणाला पोक्सो प्रकरणात अटक करण्यात आली होती. अल्पवयीन मुलीसंबंधीचा तो गुन्हा असल्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली होती. गोपाल सध्या जामिनावर आहे. ज्या अल्पवयीन मुलीला त्रास दिल्यामुळे पोक्सो प्रकरणात अटक व्हावी लागली, त्याच मुलीची आई व त्या मुलीला पुन्हा त्रास देऊ लागल्यामुळे वैतागलेल्या मायलेकींनी पोलीस स्थानकात धाव घेतली. सायंकाळी पोलीस स्थानकात नागरिकांची वर्दळ होती. त्याचवेळी मायलेक मदतीसाठी पोलीस स्थानकात दाखल झाल्या.
या मायलेकीने आपल्यासोबत गोपाललाही पोलीस स्थानकात आणले होते. पोलिसांनी मायलेकीची तक्रार ऐकून घेतली. तुम्ही थोडा वेळ बाजूला बसा, आम्ही त्याला समज देतो, असे सांगून मायलेकीला बाहेर पाठविले. तोपर्यंत त्या तरुणाने स्वत:ला पेटवून घेतले. पोलीस स्थानकात येण्याआधीच त्याने आपल्या अंगावर पेट्रोल किंवा डिझेल ओतून घेतल्याचा संशय आहे. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांची एकच धावपळ उडाली. लगेच आग विझविण्यात आली. तातडीने त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गोपालवर एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस स्थानकात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ माजली आहे.