भारतीयांना लुटणाऱ्या सायबर गुन्हेगारांची पाळेमुळे परदेशात
देशांतर्गत कारवाई शक्य : मात्र विदेशात जाणे अशक्य, सायबर पोलिसांसमोर नवे आव्हान, सुशिक्षित लोकच गुन्हेगारांच्या गळाला
बेळगाव : सायबर गुन्हेगारीचे प्रकार सुरूच आहेत. आजवर केवळ झारखंड, उत्तरप्रदेश, गुजरातमध्ये असलेली गुन्हेगारांची ठिकाणे आता परदेशात सुरू झाली आहेत. परदेशातून भारतीयांना ठकविण्याच्या व्यवहारासाठी भारतीय तरुणांचाच वापर केला जात आहे. सुमारे पंधरा हजारहून अधिक भारतीय तरुण परदेशात सायबर गुन्हेगारांच्या कॉल सेंटरमध्ये काम करीत आहेत, अशी माहिती उजेडात आली आहे. सायबर क्राईम विभागाकडून सातत्याने पाठपुरावा करूनही फशी पडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढतीच आहे. बेळगाव शहर व जिल्ह्यात डिजिटल अरेस्ट व शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरपूर नफा देण्याचे सांगून लाखो रुपयांना गंडविण्याचे प्रकार सुरूच आहेत. याआधी सायबर गुन्हेगारीचे धागेदोरे केवळ जामतारा, झारखंड, गुजरात, राजस्थान, प. बंगालपर्यंत पोहोचत होते. आता परदेशातील कॉल सेंटरमधून सावजांना ठकविण्यात येत आहे. उपलब्ध माहितीनुसार दुबईतील कॉल सेंटरमध्ये 15 हजारहून अधिक भारतीय सायबर गुन्हेगारांकडे काम करतात. कंबोडिया, इंडोनेशियामध्येही सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा धंदा थाटला आहे. सुमारे 50 कोटीहून अधिक भारतीयांचा डेटा सायबर गुन्हेगारांकडे आहे. डार्क वेबच्या माध्यमातून या माहितीची विक्री करण्यात आली आहे. हीच माहिती हातात ठेवून गुन्हेगार सावजांना ठकवत आहेत.
वारंवार जागृती करूनही फसवणूक
डिजिटल अरेस्टच्या घटनासंबंधी वारंवार जागृती करूनही सुशिक्षित लोक गुन्हेगारांच्या गळाला लागत आहेत. निवृत्त कर्मचारी, डॉक्टर, अभियंते बेअब्रू होण्याच्या भीतीने सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत. बेळगाव, विजापूर, हुबळी-धारवाड, बागलकोट आदी जिल्ह्यातील सुशिक्षितांना कोट्यावधी रुपयांना ठकविण्यात आले आहे. यासंबंधी एफआयआर दाखल झाल्यानंतर गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे सायबर क्राईम विभागाला जड जात आहे. कारण, गुन्हेगारांचे धागेदोरे परदेशापर्यंत पोहोचले आहेत.
आजवर बेळगाव शहर व जिल्ह्यासाठी दोन स्वतंत्र सायबर क्राईम पोलीस स्थानके कार्यरत होती. प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने बेळगावसह राज्यातील सीईएन पोलीस स्थानकांवर पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. लवकरच स्वतंत्र एसपी दर्जाचे अधिकारी नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. सायबर क्राईमच्या प्रकरणांच्या तपासात अडथळे येऊ नयेत म्हणून ही यंत्रणाच अधिक स्वावलंबी व स्वतंत्र बनविण्यात येत आहे. सध्या शहर व जिल्ह्यातील सायबर क्राईम पोलीस स्थानकात रोज येणाऱ्या तक्रारींचा ओघ लक्षात घेता सायबर क्राईमचे गुन्हे झपाट्याने वाढत आहेत, हे लक्षात येते.
आता चोऱ्याही ऑनलाईन
पूर्वी चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारांनी पोलीस दलासमोर तपासाचे आव्हान उभे केले होते. श्वानपथक व ठसेतज्ञांच्या मदतीने पोलीस यंत्रणा अनेक प्रकरणात गुन्हेगारांपर्यंत पोहोचत होती. आता चोऱ्याही ऑनलाईन झाल्या आहेत. दुबईत बसून बेळगाव येथील एखाद्या डॉक्टर वा अभियंत्याचे बँक खाते रिकामे केले जाते. पूर्वी एखाद्या ग्राहकाच्या बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी ओटीपीची गरज होती. आता तीही गरज नाही. केवळ सायबर गुन्हेगारांकडून येणारी लिंक क्लिक केली तरी गुन्हेगार थेट त्याच्या बँक खात्यात प्रवेश करून त्याचे पैसे हडप करतात. तुमच्या मोबाईल क्रमांकाचा वापर गुन्हेगारीसाठी झाला आहे.
तुमच्यावर दिल्ली, मुंबईत एफआयआर दाखल झाले आहेत. तुमची ऑनलाईन चौकशी करायची आहे, असे सांगत लुटण्यात येत आहे. सध्या डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची लूट केली जात आहे. स्वत: पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून व्हिडिओ कॉल करणारा सायबर गुन्हेगार झटपट चौकशी करायची आहे, यासाठी आम्ही पाठवतो त्या बँक खात्यात डिपॉझिट जमा करा, असे सांगत लाखो रुपये हडप करीत आहेत. याबरोबरच तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे अपहरण झाले आहे. थोड्या वेळात आम्ही त्याला संपवू, अशी धमकी देत रक्कम हडप करण्यात येत आहे. तुमच्या नातेवाईकांना अटक झाली आहे. त्याची सुखरुप सुटका हवी असेल तर आमच्या साहेबाशी चर्चा करा, असे सांगत सावजांना लुटण्यात येत आहे.
परदेशात बसून भारतातील नागरिकांची बँक खाती रिकामी
शेअरबाजारात गुंतवणूक करा, तुमचा फायदा होईल, असा सल्ला देत टेलिग्रामच्या माध्यमातून सावजाशी संपर्क साधणारे गुन्हेगार त्यांच्या बँक खात्यातील रक्कम हडप करीत आहेत. घरबसल्या पार्टटाईम नोकरी करा आणि दरमहा लाखो रुपये कमवा, अशी जाहिरातबाजी करीत सावजांना फसविण्यात येत आहे. तुमच्या नावे आलेल्या पार्सलमध्ये अमलीपदार्थ आहे, असे सांगूनही सायबर गुन्हेगार फसवणूक करीत आहेत. परदेशात बसून भारतातील नागरिकांची बँक खाती रिकामी करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी पोलीस दलासमोर आव्हान उभे केले असून गुजरात, उत्तरप्रदेश, प. बंगाल, झारखंडबरोबरच आता परदेशातील गुन्हेगारांची डोकेदुखी वाढली आहे.