दहशतवाद्यांच्या संपर्कात असलेला संशयित एनआयएच्या ताब्यात
ऑनलाईनद्वारे संपर्कात असल्याचा ठपका
प्रतिनिधी/ कारवार
जिल्ह्यातील शिरसी तालुक्यातील बनवासी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दासनकोप्प येथे मंगळवारी सकाळी एनआयएच्या पथकाने कारवाई करून दहशतवाद्यांच्या संपर्कात असलेल्या एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव अब्दुल शकूर (वय 32) असे आहे.
एनआयए पथकाने केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. बंदी घालण्यात आलेल्या पीएफआय या संघटनेचा सदस्य असलेला अब्दुल शकूर रोजगाराच्या निमित्ताने दुबईत वास्तव्य करून आहे. बकरी ईदच्या निमित्ताने शकूर आपले मुळ गाव असलेल्या दासनकोप्प येथे आला होता. हीच संधी साधून बेंगळुरहून आलेल्या पाच अधिकाऱ्यांच्या समावेश असलेल्या एनआयए पथकाने शकूरला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कारवाईच्या वेळी राज्य इंटीलजन्स खात्याचे अधिकारी उपस्थित होते. ताब्यात घेण्यात आलेला अब्दुल शकूर ऑनलाईनद्वारे अतिरेकी संघटनांच्या संपर्कात होता, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शिवाय तो सामाजिक माध्यमातून प्रक्षोभक पोस्ट व्हायरल करीत होता, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. पासपोर्टसाठी त्याने बनावट कागदपत्रे सादर केली होती, असे सांगण्यात आले. बेंगळूर येथील रामेश्वर कॅफे बॉम्ब स्फोट प्रकरणात अब्दुल शकूरचा संबंध असल्याचे सांगण्यात आले. एनआयएच्या पथकाने शकुरला पहिल्यांदा बनवासी पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली आणि त्यानंतर अधिक चौकशीसाठी बेंगळूरला त्याला नेण्यात आले.