पीर्ण खून प्रकरणातील संशयिताला अटक
संशयितांच्या इतर साथीदारांचा शोध सुरु : थार गाडी चोरल्याचा संशयावरून खून
प्रतिनिधी/ पणजी, म्हापसा
पीर्ण-बार्देश येथे झालेल्या खून प्रकरणातील मुख्य संशयिताला अवघ्या 15 तासांत अटक करण्यात आली आहे. संशयितांसोबत असलेले इतर साथीदार फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. मुख्य संशयिताच्या विरोधात गुन्हा नोंद करून, त्याला पोलिस कोठडीत ठेण्यात आले आहे. संशयिताच्या मालकीची भाड्याने घेतलेली थार गाडी पळविण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या संशयावरून हा खून झाला असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव गुऊदत्त सुभाष लवंदे (वय 31, कांदोळी) असे आहे. तर खून झालेल्या व्यक्तीचे नाव कपिल चौधरी (वय 19, उत्तर प्रदेश) असे आहे.
मयत कपिल चौधरी याने 30 ऑक्टोबर 2025 रोजी संशयित गुऊदत्त सुभाष लवंदे याच्या मालकीची जीए-03-5254 क्रमांकाची थार कार कांदोळी येथून भाड्याने घेतली होती. ही कार दीपक ठाकूर यांच्या नावाने एमडीएलची सॉफ्ट कॉपी बनवून कार मालकाला दिली होती. त्याच दिवशी संशयित आरोपी गुऊदत्त लवंदे याला सदर थार कार गोवा सीमा ओलांडून महाराष्ट्राच्या दिशेने जात असल्याचे ट्रॅकद्वारे (जीपीएस) आढळून आले होते. त्यामुळे संशयित त्याच्या मित्रांसह त्यांच्या थार कारचा पाठलाग करण्यासाठी आणि शोध घेण्यासाठी त्याच्या केआयए सेल्टोस कार क्रमांक जीए- 06- एप- 2937 मध्ये निघाले. त्यांनी कणकवली-महाराष्ट्र येथे कपिल चौधरी यांच्यासोबत थार कारचा शोध घेतला. कपिल चौधरी यांच्यासोबत थार कार थिवी येथे आणली. संशयितांनी कपिलवर मुक्का, लाथा आणि लाकडी दंडाने हल्ला केला. पुढे रात्री 12.00 वाजता त्यांनी त्याला जखमी अवस्थेत थिवीच्या डोंगराळ भागात सोडले. संशयितांनी थिवी येथे वाईन शॉपमधून एक दारूची बाटली (क्वार्टर) खरेदी केली आणि रिकामी बाटली त्याच्या पँटच्या खिशात ठेवली जेणेकरून जणू काही ती व्यक्ती दारू पिऊन आहे असे भासविण्यात आले, मात्र पोलिसांनी खऱ्या प्रकाराचा उघड करून मुख्य संशयित आरोपी गुऊदत्त सुभाष लवंदे याला शुक्रवारी रात्री पोलिस निरीक्षक निखिल पालेकर आणि त्यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याची कसून उलट तपासणी केली असता संशयिताने इतर साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. इतर संशयित सध्या फरारी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. कोलवाळ पोलिस स्थानकाचे निरीक्षक संजित कांदोळकर आणि उपविभागीय पोलिस निरीक्षक म्हापसा विल्सन डिसोझा यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे.
अशी पटली मयताची ओळख
दरम्यान, मयताची ओळख पडताळणीचे काम सुऊ असताना श्रीनिवास नबाब सिंग (वय 46, उत्तर प्रदेश) हे पोलिस स्थानकात हजर झाले आणि त्यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा कपिल चौधरी (वय 19, उत्तर प्रदेश) गोव्याला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता तो सापडत नाही आणि त्याचा मोबाईल फोनही बंद आहे आणि त्याचे शेवटचे ठिकाण थिवीमध्ये दाखवण्यात आले आहे. श्रीनिवास यांनी सांगितलेले वर्णन मृत व्यक्तीशी जुळत असल्याने, त्याला ओळख पटविण्यासाठी शवागारात नेण्यात आले. श्रीनिवास यांनी मृतदेह त्यांचा मुलगा कपिल चौधरी याचा असल्याचे ओळखले. मुलगा कपिल चौधरी यांचा खून केल्याबद्दल आणि मोबाईल फोन आणि बॅगसह त्याचे सामान घेऊन गेल्याबद्दल अज्ञात व्यक्तींविऊद्ध त्यांनी तक्रार दाखल केली होती.
डोंगराळ भागात रस्त्याच्या बाजूला मृतदेह आढळला
शुक्रवार 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता, अज्ञात व्यक्तीचा पोलिसांना फोन आला होता. त्यात पीर्ण डोंगराळ भागात रस्त्याच्या कडेला एक पुरूष पडलेला आढळला असल्याचे म्हटले होते. कोलवाळ पोलिस स्थानकाच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पीर्ण गावातील डोंगराळ भागात रस्त्यापासून सुमारे 3 मीटर अंतरावर गवताळ भागात राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि निळा रंगाचा जीन्स पॅन्ट घातलेला सुमारे 25-30 वर्षांचा एक पुरूष पडलेला आढळला. पडताळणी केल्यावर असे आढळले की, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर अनेक जखमा आहेत आणि चेहरा सुजलेला दिसून आला. त्याच्या दोन्ही हातांवर ओरखडे पडलेले आणि तो हालचाल करत नव्हता. तपासणी केल्यावर त्याच्या पँटच्या खिशात एक पॅन कार्ड सापडले. तसेच दारूची एक रिकामी क्वार्टर आकाराची बाटलीही सापडली. दरम्यान, 108 रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. जखमी व्यक्तीला 108 ऊग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा ऊग्णालयात हलवण्यात आले. म्हापसा जिल्हा ऊग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली आणि त्याला मृत घोषित केले.