तीन दिवसांनंतरही संशयित फरार
रुद्रण्णा आत्महत्या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेबद्दल जनतेत संभ्रम : प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?
बेळगाव : तहसीलदार कार्यालयातील एसडीए रुद्रण्णा यडवण्णावर (वय 34) आत्महत्या प्रकरणाचा तपास खडेबाजारच्या एसीपींकडे सोपविण्यात आला आहे. तहसीलदारसह तिघेजण तीन दिवसांपासून फरारी असून पोलीस दलाकडून हे प्रकरण व्यवस्थित हाताळण्याऐवजी दडपण्यासाठीच प्रयत्न सुरू आहेत की काय? असा संशय बळावला आहे. या प्रकरणाचा तपास खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी दिली. रुद्रण्णाचा मोबाईल जप्त करून विधिविज्ञान प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. काही कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. त्यामुळे प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयांना नोटीस पाठवून ते मागविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकरण दडपण्यासाठीच प्रयत्न?
रुद्रण्णा आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी भाजप आक्रमक झाला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांतील पोलीस दलाची भूमिका लक्षात घेता प्रकरण दडपण्यासाठीच प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते. गुरुवारी खडेबाजार पोलिसांनी तहसीलदार कार्यालयाला भेट देऊन पंचनामा केला. कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. पोलीस तपासाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिवसभर तहसीलदारांच्या कक्षाला टाळे ठोकण्यात आले होते. या घटनेने तहसीलदार कार्यालयातील कर्मचारीही धास्तावले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आंदोलनासाठी गुरुवारी बेळगावात आलेले विधानसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते अरविंद बेल्लद यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने रुद्रण्णा यांच्या निवासस्थानाला भेट देऊन आई व पत्नीचे सांत्वन केले. खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच., पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी आदी अधिकारी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाच्या तपासात गुंतले होते. गुरुवारीही रुद्रण्णाच्या कुटुंबीयांना पोलीस स्थानकात बोलावून त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली. सखोल चौकशीसाठी जर विरोधी पक्षाचा दबाव वाढला तर इतर प्रकरणांप्रमाणे हे प्रकरणही सीआयडी किंवा एसआयटीकडे सोपविण्याची शक्यता आहे.
तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांची पोलीस स्थानकात बोलावून चौकशी
गुरुवारी सायंकाळी तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पोलीस स्थानकात बोलावून त्यांची चौकशी करण्यात येत होती. रुद्रण्णाचा मृतदेह ज्यांनी पहिल्यांदा पाहिला, त्याच्यासह इतर कर्मचाऱ्यांनाही बोलावून त्यांची चौकशी करण्यात येत होती.