सूर्यकुमारला पहिला सामना हुकणार
वृत्तसंस्था/ मुंबई
स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आयपीएलमधील पहिल्या दोन सामन्यात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मुंबई इंडियन्सचा सलामीचा सामना 24 मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. सूर्याला एनसीएकडून अजून फिटनेस सर्टिफिकेट मिळाले नसल्याचे सांगण्यात आले.
टी-20 जागतिक फलंदाजांच्या मानांकनात अव्वल स्थानावर असणाऱ्या सूर्यकुमारची सध्या बेंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅब व रिकव्हरी प्रक्रिया सुरू आहे. स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो तेथे दाखल झाला आहे. गेल्या डिसेंबरपासून तो क्रिकेटपासून दूर असून मंगळवारी त्याची फिटनेस चाचणी घेण्यात आली. पण त्याच्या तंदुरुस्तीचा आणखी आढावा घेण्याची गरज असल्याचे वृत्तंसंस्थेने म्हटले आहे. मुंबईचे त्यानंतरचे सामने सनरायजर्स (27 मार्च), राजस्थान रॉयल्स (1 एप्रिल) व दिल्ली कॅपिटल्स (7 एप्रिल) यांच्याविरुद्ध होणार आहेत. त्यामधील सूर्याच्या सहभागाविषयी नंतर निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
जखमी बेहरेनडॉर्फच्या जागी ल्युक वूड
मुंबई इंडियन्सने इंग्लंडचा डावखुरा वेंगवान गोलंदाज ल्युक वूड याची ऑस्ट्रेलियाच्या जेसन बेहरेनडॉर्फ याच्या जागी निवड केली आहे. वूडला मुंबईकडून 50 लाख रुपये दिले जाणार आहेत. सरावावेळी बेहरेनडॉर्फ जखमी झाल्याने मुंबईला हा निर्णय घ्यावा लागला आहे. वूडने इंग्लंडतर्फे 5 टी-20 आणि 2 वनडे सामने खेळले आहेत. टी-20 मध्ये त्याने 8 बळी घेतले आहेत. मुंबई संघाचे गोलंदाज दिलशान मदुशनका व गेराल्ड कोएत्झी यांनाही दुखापतीच्या समस्या असून पहिल्या सामन्यातील त्यांच्या सहभागाबाबत साशंकता आहे.