दोन्ही शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई
गेल्या पंचवीस-तीस वर्षांपासून कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादीच्या वाट्याला एक-एकच जागा आली आहे. काँग्रेसची पाटी कोरीच राहिली आहे. येथील सर्वाधिक जागा दोन्ही शिवसेना लढवित आहेत. त्यामुळे दोन्ही शिवसेनेसाठी ही निवडणूक वर्चस्वाची लढाई ठरली आहे. दोन्ही शिवसेना आमने-सामने असल्याने यात कोणती शिवसेना बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. त्यातून खरी शिवसेना कुणाची हेही स्पष्ट होणार आहे.
एप्रिल, मे 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होऊन या लढतीत कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार नारायण राणे विजयी झाले आणि महाविकास आघाडीचे ठाकरेसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव झाला होता. त्यामुळे गेल्या 25-30 वर्षांपासून असलेल्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला भाजपने सुरुंग लावत कोकणच्या इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुलविले. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधून आठ विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपला फक्त कणकवली विधानसभा मतदारसंघाची एकच जागा महायुतीत वाट्याला आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटालाही चिपळूणची एकच जागा वाट्याला आलेली आहे. कधीकाळी कोकणावर वर्चस्व असलेल्या काँग्रेसला मात्र एकही जागा मिळविता न आल्याने काँग्रेसची पाटी कोरीच राहिली आहे. दोन्ही शिवसेनेने मात्र आठ पैकी सहा जागांवर निवडणूक लढवित वर्चस्वाची लढाई सुरू पेली आहे.
2019 च्या निवडणुकीत राज्यात एकसंघ असलेली शिवसेना व भाजप अशी युती होती. तर विरोधात एकसंघ असलेले राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अशी आघाडी होती. मात्र, 2019 च्या निवडणूक निकालानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत महाविकास आघाडी करून सत्ता स्थापन केल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलत गेली. मोठ्या राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झाली. महाविकास आघाडीला अडीच वर्षे होताच, शिवसेनेत मोठे बंड निर्माण झाले. त्यामुळे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन सत्तेतून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर दोन शकले झालेल्या शिवसेनेतील शिंदे शिवसेनेने भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली. या युती सरकारला एक वर्ष होताच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंड झाले व राष्ट्रवादीचीही दोन शकले झाली. अजित पवार सत्तेत सामील झाल्याने राज्यात महायुती सरकार सत्तेत आले. त्यामुळे राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत लोकसभा निवडणुकीतही पाहायला मिळाली. मागील 5 वर्षांत घडलेल्या या राजकीय घडामोडीनंतर प्रथम लोकसभा निवडणूक झाली. त्यानंतर विधानसभा निवडणूक पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे आता लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही दोन शकले निर्माण झालेल्या शिवसेनेत खरी शिवसेना कोणाची, याचीही लढाई सुरू झालेली आहे.
शिंदे-शिवसेनेने शिवसेनेचा धनुष्यबाण मिळवून आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने या निवडणुकीत खरी शिवसेना कोणाची हे निवडणूक निकालातून स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आगामी काळात जिल्हा परिषद व नगर परिषदांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूक निकालाचा परिणाम पुढील निवडणुकांमध्ये होऊ शकतो. त्यासाठी आतापासूनच निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे. त्यात विशेष करून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात दोन्ही शिवसेना सर्वाधिक जागा लढत आमने-सामने असल्याने कोणाचे वर्चस्व राहणार, यासाठीही अस्तित्वाची लढाई दोघांच्या दृष्टीनेही प्रतिष्ठेची ठरणार आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. या पाच पैकी चिपळूण हा मतदारसंघ दोन्ही राष्ट्रवादींच्या गटाकडे गेला आहे. त्याठिकाणी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम, तर शरद पवार गटाकडून प्रशांत यादव निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे कोकणात राष्ट्रवादीकडे असलेल्या एकमेव जागेसाठी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघ हा महायुतीकडून भाजपसाठी सोडण्यात आला असल्याने भाजपचे उमेदवार नीतेश राणे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे सेनेचे संदेश पारकर निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप अशी निवडणूक होत आहे.
कोकणातील चिपळूण व कणकवली हे दोन मतदारसंघ वगळता उर्वरित सहा मतदारसंघात ठाकरे सेनेचे सहा आणि शिंदे सेनेचे सहा असे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे कोकणात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत होत असून दोन्ही शिवसेनेने आपल्या वर्चस्वाच्या लढाईसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. यात कुडाळ मतदारसंघातून ठाकरे सेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक विरुद्ध शिंदेसेनेचे माजी खासदार नीलेश राणे यांच्यात लढत होत आहे. सावंतवाडी मतदारसंघातून शिंदेसेनेचे विद्यमान आमदार दीपक केसरकर विरुद्ध ठाकरे सेनेचे माजी आमदार राजन तेली यांच्यात लढत होत आहे. राजापूर मतदारसंघात ठाकरे सेनेचे विद्यमान आमदार राजन साळवी विरुद्ध शिंदे सेनेचे किरण सामंत यांच्यात, रत्नागिरी मतदारसंघात शिंदेसेनेचे विद्यमान आमदार उदय सामंत विरुद्ध भाजपमधून ठाकरे सेनेत गेलेले बाळ माने यांच्यात, गुहागर मतदारसंघात ठाकरे सेनेचे विद्यमान आमदार भास्कर जाधव विरुद्ध शिंदेसेनेचे राजेश बेंडल यांच्यात, दापोली मतदारसंघात शिंदेसेनेचे विद्यमान आमदार योगेश कदम विरुद्ध ठाकरे सेनेचे संजय कदम यांच्यात लढत होत आहे.
कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील 8 मतदारसंघांमध्ये अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असले, तरी बहुतेक ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी दुरंगी लढत होत आहे. मात्र, सावंतवाडी आणि राजापूर मतदारसंघात बंडखोरी झाल्याने या दोन मतदारसंघात चौरंगी व तिरंगी लढती होत आहेत. सावंतवाडी मतदारसंघात भाजपयुवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब हे बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. त्यांना आता भाजपने निलंबितही केले आहे. तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अर्चना घारे-परब यांनीही बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने या मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. त्यामुळे प्रमुख उमेदवारांसाठी ही बंडखोरी डोकेदुखी ठरली आहे. दुसरीकडे राजापूर मतदारसंघातही महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे अविनाश लाड यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांच्यासाठी डोकेदुखी वाढली आहे.
कोकणात सर्वाधिक जागा लढवित असलेल्या दोन्ही शिवसेनेंसाठी ही वर्चस्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई ठरलेली आहे. लोकसभा निवडणुकीत दोन्ही शिवसेनेंनी राज्यात चांगलं यश मिळविले होते. परंतु, यात कोकणातून त्यांना अपेक्षित यश मिळू शकलेले नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ ठाकरे शिवसेनेने लढून सुद्धा आपला बालेकिल्ला त्यांना राखता आलेला नाही. शिंदेसेनेने तर या मतदारसंघातून माघारच घेत भाजपला जागा सोडली होती. त्यामुळे शिंदे शिवसेनेला आता विधानसभा निवडणुकीत भाजपकडून कशा पद्धतीने पाठबळ मिळणार, यावर यशापयशाबाबत बरेच काही अवलंबून राहणार आहे. दुसरीकडे ठाकरेसेनेला लोकसभा निवडणुकीत बसलेला धक्का सहन करून लोकसभेतील पराभवाचा बदला विधानसभा निवडणुकीत घेऊन पुन्हा एकदा शिवसेनेचे वर्चस्व निर्माण करण्याचे आव्हान आहे. एक मात्र खरे की, या निवडणुकीमध्ये शिंदे-शिवसेना जिंको किंवा ठाकरे शिवसेना जिंको, कुठली तरी एक शिवसेना जिंकणारच आहे. मात्र, या निकालातून कोकणात खरी शिवसेना कोणाची हे स्पष्ट होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून तत्पूर्वी निवडणूक उमेदवारांच्या प्रचारासाठी नेत्यांकडून प्रचारसभा सुरू झालेल्या आहेत. सद्यस्थितीत या वर्षी उशिरापर्यंत पाऊस लांबल्याने भातकापणी अजूनही सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदार हा अजूनही शेतीच्या कामात व्यस्त आहे. तर दुसरीकडे निवडणूक प्रचाराला वेग आलेला आहे. त्यामुळे निवडणूक प्रचार करताना मतदारांपर्यंत कसे पोहोचायचे, याची रणनीती आखताना पक्षीय कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे. वरिष्ठ नेत्यांच्या प्रचारसभा कशा पद्धतीने होतात व प्रचारातील मुद्दे मतदारांपर्यंत किती प्रभावी होतात, यावरही दोन्ही शिवसेनेच्या वर्चस्वाबाबतची लढाई पार पडणार आहे. खरी शिवसेना कुणाची हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
संदीप गावडे