For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्मयोगी विकाररहित असतो

06:15 AM Nov 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्मयोगी विकाररहित असतो
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

बाप्पा म्हणाले, मनुष्याच्या पूर्वकर्मानुसार त्याचं या जन्मीचं कार्य नियती ठरवत असते आणि ते फळाच्या अपेक्षेनं करायचं की, निरपेक्षतेनं करायचं हे ठरवण्याचे स्वातंत्र्य मात्र माणसाला आहे. बहुतेक लोकांना ह्या सर्व यंत्रणेची माहिती नसल्याने ते फळाच्या मोहात पडून, फळाच्या अपेक्षेनं कर्म करतात. त्यामुळे त्यातून पाप पुण्याची निर्मिती होते व त्यानुसार त्याच्या पुढील जन्माची जुळणी होते. जर त्यानं फळाचा मोह झुगारून निरपेक्षतेनं कर्म केलं, तर पाप पुण्याचा हिशोब होत नसल्याने तो मुक्त होण्यास पात्र होतो. जर मनुष्याच्या हे लक्षात आले की, आपला देह ही आपली खरी ओळख नसून आपण आत्मस्वरूप आहोत तर त्याला तर त्याला श्रेष्ठ ज्ञान प्राप्त होतं असं बाप्पा आपण सध्या अभ्यासत असलेल्या  विवेकेनात्मनोऽ ज्ञानं येषां नाशितमात्मना । तेषां विकाशमायाति ज्ञानमादित्यवत्परम् ।।15 ।। ह्या  श्लोकात सांगत आहेत. त्यानुसार स्वत:चा उद्धार करून घेण्याच्या दृष्टीने जो मनुष्य निरपेक्षतेने कर्म करत असतो. त्याच्या हळूहळू हे लक्षात येते की, कर्ता करविता ईश्वर असून तो त्यानं दिलेल्या प्रेरणेनुसार कार्य करत आहे.

त्याला कुणाकडून कसलीही अपेक्षा नसल्याने कोणतंही काम करताना त्याला स्वत:चं डोकं वापरावं लागत नाही हेच परंज्ञान किंवा आत्मज्ञान होय.

Advertisement

अध्यात्माच्या भाषेत यालाच नुसतं ज्ञान असंही म्हणतात. अपेक्षाच नसल्याने त्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून कुणाविषयी कर्मयोगी साधकाच्या मनात राग नसतो. तसेच पूर्ण झाल्या म्हणून कुणाबद्दल खास प्रेमही नसतं. तो सर्वांशी सारखंच वागत असतो. सर्वांचं हित साधायचा प्रयत्न करतो. त्यासाठी लोककल्याणकारी कार्य तो आयुष्यभर करत असतो.

तसं बघायला गेलं तर आपण सर्व ईश्वराची लेकरं असल्याने आपणा सर्वांनाच कर्म करण्यासबंधी ईश्वरी प्रेरणा होत असते पण स्वार्थ साधण्यासाठी आपण त्याकडं दुर्लक्ष करून आपलं डोकं चालवून ते कर्म करायचा प्रयत्न आपण करत असतो. ते अकर्म या सदरात मोडतं. त्यातून काही वेळा आपल्याला हवं ते मिळतही पण ते कायमचं टिकाऊ नसल्याने आपण पुन्हा आणखीन काहीतरी मिळवण्याच्या प्रयत्नाला लागतो. त्यातून निर्माण होणाऱ्या पापपुण्याची जबाबदारी आपल्यावर पडते आणि त्यातूनच आपले पुनर्जन्म होत राहतात. आपल्या हातून ही सर्व वर्तणूक अज्ञानापोटी होत असते पण सुरवातीला म्हंटल्याप्रमाणे कर्मयोगी साधकाचं अज्ञान दूर झालेलं असतं. कर्मयोगाच्या आचरणाने त्याची सर्व पातके दूर होतात अशी ग्वाही बाप्पा पुढील श्लोकात देत आहेत.

मन्निष्ठा मद्धियोऽ त्यन्तं मच्चित्ता मयि तत्पराऽ ।

अपुनर्भवमायान्ति विज्ञानान्नाशितैनस ।।16 ।।

अर्थ-माझ्या ठिकाणी निष्ठा असलेले, माझ्या ठिकाणी बुद्धि असलेले, माझ्या ठिकाणी चित्त असलेले व माझ्या ठिकाणी तत्पर असलेले, अनुभवयुक्त ज्ञानाने पापाचा नाश झाल्यावर पुन: जन्म पावत नाहीत.

विवरण- बाप्पा म्हणतात, माझ्या ठिकाणी ज्यांची निष्ठा, बुद्धी आणि चित्त जडलेलं आहे त्यांना मी सांगतोय त्यात कोणतीही शंका नसते. त्यामुळे कोणताही किंतु परंतु मनात न बाळगता ते त्याप्रमाणे वागतात. त्यांना स्वार्थबुद्धी नसते. त्यामुळे जशी प्रेरणा होईल त्याप्रमाणे ते तत्परतेने कार्य करत राहतात. या सर्वांच्या पाठीमागे मी असून हे सर्व मीच त्यांच्याकडून करून घेत आहे हे ज्ञान त्यांना अनुभवाने मिळालेले असते. त्यामुळे त्यांचे पाप नष्ट होऊन त्यांचा पुनर्जन्म होत  नाही. निष्काम कर्मयोगाचं आचरण आपल्याला ईश्वराशी जोडून देणारं आहे हे लक्षात आल्याने तो बिनघोरपणे वाट्याला आलेलं काम ईश्वरी काम समजून आयुष्यभर करत असतो.

क्रमश:

Advertisement
Tags :

.