For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्व्हेचा बाऊ कार्यकर्त्यांना बंडखोर बनवतोय!

06:20 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्व्हेचा बाऊ कार्यकर्त्यांना बंडखोर बनवतोय
Advertisement

लोकसभा निवडणुकीमध्ये प्रमुख सहा पक्ष शिवाय वंचित, स्वाभिमानी, बविआ सारख्या आघाड्या असा राजकीय परीघ तुकड्या तुकड्यात विभागला असतानाही उमेदवारी बाबतीत कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही अशी स्थिती सर्वच राजकीय पक्षात निर्माण झाली आहे. सत्तापक्षात सर्व्हेचा बागुलबुवा इतका मोठा झालाय की भाजपच्या जळगावच्या खासदाराला चिडून पक्ष सोडावा लागला. इतर पक्षातही धुसफूस मोठी आहे. गेल्या आठवड्यात याच स्तंभात मुख्यमंत्री समर्थकांची दुर्दशा मांडली होती. त्याहून शिंदेसेनेची आजची स्थिती अधिक गंभीर बनली आहे. अजितदादाही मर्यादित होऊ लागलेत.

Advertisement

गेल्या आठवड्यात याच स्तंभामध्ये मुख्यमंत्री समर्थक खासदारांची स्थिती कशी असेल याचा विचार झाला होता. या संपूर्ण आठवड्यात त्याचे प्रत्यंतर येत गेले. भावना गवळी, कृपाल तुमाने, हेमंत पाटील यांना ज्या पद्धतीने घरी बसावे लागले आहे त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वालाही धक्का लागला आहे. आता अशा सर्वांचा फटका अधिकृत उमेदवारांना बसू नये म्हणून गवळी यांच्या पुनर्वसनाची भाषा सुरू झाली. तिथे पाटील यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. ही गेम संजय राठोड यांनी केली आहे अशी गवळी समर्थकांची भावना आहे. त्यांच्यामुळे भाजप आणि शिंदेंनी या ‘भावना’ पायदळी तुडवल्या अशी टीका ठाकरे सेनेकडून झाली.

कृपाल तुमानेंच्या जागी काँग्रेसमधून आयात करून भाजपच्या शिफारशींवर उमेदवार देणे म्हणजे फारच झाले. ठाकरेंनी त्यामुळे या मंडळींवरही टीका करण्याची संधी साधली. चार, पाच टर्म ज्यांना सहज ए बी फॉर्म दिले जायचे त्यांना हा मोठाच धक्का होता. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना पक्षात घेतले तर तो निष्ठावंत कार्यकर्त्यांचा अपमान होईल असे जाहीर करून संजय राऊत यांनी टाळ्या वसूल केल्या. पण, खरंच तळातल्या कार्यकर्त्यांचे म्हणणे हे सर्व पक्ष ऐकून घेतात का? महायुतीतील भाजप, शिंदे सेना, दादांची राष्ट्रवादी तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरे सेना, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तसेच वंचित बहुजन आघाडीमध्येही कोणीतरी नेता ठरवतो आणि त्याच्या मर्जिबरहुकुम सर्व्हे दाखवले जातात. ते सर्व्हे म्हणजे आता अंतिम शब्द होऊ लागला आहे. अशा सर्व्हेवर विसंबून राहून ते जनतेचे अधिकृत मत आहे असे भासवणे हल्ली सोपे झाले आहे. माध्यमांमध्ये वास्तव दर्शन कमी होत चालले असताना, स्पष्ट मांडणी करणाऱ्यांची कमतरता असताना आणि पक्षांमध्ये दरबारी राजकारणी, होयबा लोकांचे महत्त्व निर्माण झाल्याने सगळेच पक्ष आणि त्या पक्षाचे नेते हे कोणावर तरी विसंबून आहेत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. थेट जनतेत मिसळण्याची आणि त्यांची नस पकडण्याची क्षमता असणारे नेते महाराष्ट्रात प्रत्येक पक्षात आहेत.

Advertisement

मात्र, सत्तेचा स्पर्श लागताच त्यांचा जनतेशी संपर्क तुटतो आणि आसपास खुशमस्करे, हितसंबंधी यांची इतकी गर्दी वाढते की ते म्हणतात तेच खरे असे मानले जाऊ लागते. मग या लोकांच्या हितसंबंधास बाधा पोहोचवणारे मात्र प्रत्यक्षात जनतेत असणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार अशा मंडळींना खटकू लागतात. अशा सर्वच मंडळींना बाजूला करण्याचे राजकारण यावेळी थेट तिकीट वाटपावेळी दिसून येऊ लागले आहे. निवडणुकीच्या काळात सुरू असणारा हा गोंधळ सर्वसामान्य कार्यकर्त्यांना खटकतो. मात्र त्यांनी बोलायचे कोणाकडे आणि त्यांचे ऐकणार कोण? अशी सध्या राजकीय पक्षांतील स्थिती आहे. एका जिह्यातील दोन-चार नेत्यांनी एकत्र यावे आणि एखाद्याचा काटा काढावा हे आता सहज सोपे झाले आहे. अशा उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानापासून दूर ठेवण्यासाठी सर्व्हे नावाचा प्रकार खूपच उपयोगी पडतो आहे, हे विशेष.

पूर्वी राजकीय पक्षाची उमेदवारी एखाद्या कार्यकर्त्याला द्यायची असेल तर तळागाळापासून त्याला उमेदवार केले जावे असा आवाज उठायचा. पक्षातील त्या माणसाचे महत्त्व आणि जनमानसात त्याचे असणारे स्थान यांची किंमत केली जायची आणि नंतर त्याची आर्थिक परिस्थिती नसली तरी सुद्धा त्याला पक्षाची उमेदवारी मिळायची.

अलीकडच्या काळात असे स्वत:ला गरीब आणि मजुराचा मुलगा वगैरे सांगणारे आर्टिफिशल नेते खूप जन्माला आले आहेत. मात्र त्यांच्या डोक्यावर कोणाचा तरी हात आहे आणि कोणाचा तरी काटा काढण्यासाठी असे चुनचुनीत बाळ आडवे टाकण्यात आले आहे, हे लोक सहज ओळखतात. हा खेळ पुढे पेड कार्यकर्ता जन्माला घालतो आहे. त्यामुळे आता बूथचे दर ठरू लागले आहेत. परिणामी लोकांमध्ये जाणे, त्यांचे प्रश्न मांडणे, त्यावर चर्चा करणे याचे महत्त्व संपले आहे. इमेज बिल्डिंग करून देणाऱ्या कंपन्यांच्या तालावर नेते आणि उमेदवार नाचायला लागले आहेत. जातींची नसलेली गणिते मांडून वातावरण नासवले जात आहे. नको ती विशेषणे आणि नको तसल्या घोषणा, प्रतीस्पर्धांच्या बदनामी यावर भर देणारे, महागात महाग राजकारणाचे दर्शन घडून येत आहे. या कंपन्यांच्या तालावर नेते अजून किती नाचणार आहेत? असा प्रश्न आता अस्वस्थ कार्यकर्ते विचारत आहेत. उमेदवारी नाकारण्यात आल्याने जळगावचे भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करून आपल्या समर्थक करण पवार यांना उमेदवारी मिळवून दिली. हे शिस्तबध्द भाजपातील चित्र आहे. कारण इथली घुसमट सर्वात मोठी आहे. त्यात पक्षाचे प्रमुख नेते आपल्या पक्षाकडे न बघता इतर दोन प्रतिस्पर्ध्यांच्या पक्षात लक्ष घालत फिरत आहेत.

फडणवीस आपल्या पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज भरता भरता अचानक इंदापूरला हर्षवर्धन पाटील यांच्या स्टेजवर गेले. तिथे मलिदा गँग वगैरे शब्द काही वत्ते वापरत होते! त्यावरून मित्रपक्षातील गोडी कितपत वाढीस लागली आहे हे ध्यानात यावे. उत्तर मध्य मुंबईत प्रमोद महाजनांच्या मुलीच्या उमेदवारीचा निर्णय होत नाही हा इथे चर्चेचा विषय बनलाय. गोपाळ शेट्टी असेच वैतागलेले दिसताहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची चिंता वाढली आहे तर रावेरमध्ये रक्षा खडसेच परत उमेदवार झाल्याचा राग राजीनाम्याने व्यक्त होतोय.

विरोधक खूप सुखी आहेत असे नाही. सांगली आणि भिवंडीवरून काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याशी झगडत आहे. संजय राऊत सांगलीत तळ ठोकून बसलेत तर विश्वजित कदम यांनी दिल्ली गाठली आहे. नागपुरात नितीन विरुद्ध नितीन लढाई होऊ दिली नाही अशी खंत नितीन राऊत व्यक्त करत असून तिथे ‘विकास विरुद्ध नितीन’ अशी वेगळीच लढत होणार आहे. प्रमुख व्यक्तींना नंतर असा पश्चात्ताप करावा लागतोय, कारण नेत्यांचा पक्षाशी संपर्क तुटलाय. दरबारी ठरवतील ते निर्णय लादून मग आपले महत्त्व जपण्यासाठी नेत्यांना धडपड करावी लागत आहे, आणि ती कुणालाही चुकलेली नाही..!

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.