For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टक्का नि धक्का...

06:45 AM May 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
टक्का नि धक्का
Advertisement

लोकसभा निवडणुकीत चौथ्या टप्प्यात देशातील दहा राज्यांमधील 96 मतदारसंघांमध्ये सरासरी 66 टक्क्यांवर मतदान झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. तर महाराष्ट्रासारख्या राज्यात हा आकडा 60 टक्क्यांच्या आसपास सीमित राहिल्याचे दिसून येते. हे पाहता महाराष्ट्रातील उर्वरित एक व देशातील अन्य तीन टप्पे महत्त्वाचे असतील. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष यंदा मोठ्या तयारीने लोकसभेच्या रणांगणात उतरला आहे. किंबहुना, टप्प्यागणिक ‘अब की बार, चारसो पार,’ हा भाजपाचा नारा काहीसा क्षीण झालेला दिसतो. त्यात 2014, 2019 सारखे उत्स्फूर्त मतदान दिसत नाही. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 77.63 टक्के, ओडिशात 72.13, उत्तर प्रदेशात 58, मध्य प्रदेशात 59, आंध्रात 64, तेलंगणात 64, बिहारमध्ये 57, झारखंडमध्ये 64, तर जम्मू काश्मीरमध्ये 38 टक्के इतके मतदान झाले आहे. 2019 च्या आकडेवारीचा विचार केला, तर मतदानात साधारणपणे दोन ते अडीच टक्क्यांनी घट झाल्याचे पहायला मिळते. ही घट कुणाच्या पथ्यावर पडणार नि कुणाला मारक ठरणार, याचे नेमके उत्तर निकालाच्या दिवशी म्हणजेच 4 जूनलाच मिळू शकेल. तथापि, त्यातून काही अंदाज नक्कीच बांधता येतात. मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढणे किंवा कमी होणे, ही निर्णायकी असते. म्हणजे कुणाला तरी पाडण्यासाठी वा धक्का देण्यासाठी हा टक्का सेट झालेला असतो, असे बव्हंशी विश्लेषक सांगतात. त्यात तथ्य असो वा नसो. पण, आज तरी जादा मतदान वा अत्यल्प मतदान अशी स्थिती देशात आढळत नाही. परंतु, महाराष्ट्रासह बिहार, यूपीसारख्या काही राज्यांतील आकडेवारी बघता बलाबलात बदल होण्याची चिन्हे स्पष्ट दिसतात. 2014 व 2019 मध्ये महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभर मोदी लाट होती. या लाटेत काँग्रेससारख्या मुख्य विरोधी पक्षाबरोबरच प्रादेशिक पक्ष पालापाचोळ्यासारखे उडून गेले. देशावर 60 वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेसची गाडी तर 50 च्या पुढेही सरकू शकली नाही. परंतु, दहा वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. अतिशय तीव्रतेचा नसला, तरी अॅन्टी इन्कबन्सीसारखा पॅक्टर काही भागांत नक्कीच जाणवला आहे. तर एकूणच महागाई, बेरोजगारीबरोबरच जनसामान्यांशी निगडित मुद्द्यांऐवजी केवळ ध्रुवीकरणासारख्या बाबींवर दिला जाणारा भरही लोकांच्या नाराजीचे कारण ठरल्याचे बोलले जाते. असे असले, तरी उत्तरेतील राज्यांमध्ये सत्ताधारी आपले वर्चस्व टिकवून असल्याचा रागरंग आहे. मात्र, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, हरियाणा वा तत्सम राज्यातील उलटी हवा पाहता भाजपाचा आकडा अडीचशेच्याच आसपास राहील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होतो. ग्राऊंडवरील वातावरण पाहता यामध्ये मोठा बदल संभवत नाही. महाराष्ट्रात चार टप्पे पार पडले आहे. आता पाचव्या टप्प्यात मुंबई, ठाणे, नाशकात मतदान होईल. आर्थिक राजधानीवरील वर्चस्वासाठी भाजपा, शिंदे गट जीवाचे रान करणार, हे वेगळे सांगायला नको. तसे मागचे चारही टप्पे महायुतीला जडच गेले आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राबरोबरच खान्देशसारख्या बालेकिल्ल्यातही भाजपाला झुंजावे लागत असेल, तर त्यातून काय ते समजून जावे. मागच्या अडीच ते तीन वर्षांत महाराष्ट्रात ज्या राजकीय उलथापालथी पहायला मिळाल्या, त्या अकल्पित व सामान्य माणसाच्या आकलनापलीकडच्या होत्या. तशी राज्याला, देशाला पक्षांतरे नवीन नाहीत. मात्र, एकदा नव्हे, तर दोनदा दोन मोठे पक्ष फोडण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे ज्यांच्या हाती पक्षाची धुरा होती किंवा ज्यांनी पक्ष निर्माण केला, त्यांनाच बेदखल करण्यात आले. पक्ष, त्याचे नाव, चिन्ह अशा प्रकारे हिसकावले गेले, की हे कायद्याचे राज्य आहे का, असा प्रश्न सामान्य माणसाला पडावा. त्यातूनच एक नरेटिव्ह सेट झाले. हे नकारात्मक वातावरण वर्षा सहा महिन्यात लोक विसरून जातील, असा भाजपा, शिंदे गट व अजितदादा गटाच्या महाशक्तीचा समज होता. प्रत्यक्षात महापालिका वा तत्सम निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. अगदी लोकसभा, विधानसभा तोंडावर आली. तर महाराष्ट्रातील जनतेला या साऱ्याचे विस्मरण झाले, असे दिसले नाही. महाराष्ट्र हे एक सुसंस्कृत राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा, सर्वसमावेशक विचारांचा वारसा या राज्याला लाभला आहे. अशा महाराष्ट्रात राजकारणाचा दर्जा जेव्हा केव्हा घसरला, तेव्हा मतदारांनी संबंधित राज्यकर्त्यांना धडा शिकवल्याचा इतिहास आहे. लोकसभा निवडणुकीतही या पेक्षा वेगळे काही होण्याची शक्यता नाही. महायुतीने महाराष्ट्रात 45 प्लसचा नारा दिला आहे. मागच्या वेळी सेना व भाजपा युतीला राज्यात 42 जागा मिळाल्या होत्या. या खेपेला या यशाची पुनरावृत्ती होण्याची तीळमात्र शक्यता नाही. प्रारंभी महायुती व महाविकास आघाडीला समसमान संधी असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, महायुतीचा वरचष्मा असलेल्या टापूत झालेले तोडीस तोड सामने पाहता महाविकास आघाडीची गाडी 30 ते 35 जागांवरही जाऊ शकते, असे म्हणायला नक्कीच वाव आहे. मुंबई, ठाण्यात बहुतांश ठिकाणी सेना विऊद्ध सेना असे सामने होत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांना मिळणारा प्रतिसाद, रवींद्र वायकर यांनी आपण दबावातून शिंदे गटात आल्याची दिलेली कबुली, एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची नकारात्मक मानसिकता आदी घटक पाहता शिंदेसेनेला फार यश मिळेल, असे म्हणणे धारीष्ट्याचे ठरेल. भाजपाच्या म्हणून काही जागा आहेत. त्या ते टिकवतील. परंतु, अजितदादा गटाकडे एखाद दुसरी जागा तरी येणार काय, याबाबत साशंकता व्यक्त होते. मागच्या वेळी महाराष्ट्रात काँग्रेसला एक जागा मिळाली होती. त्यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जागा वाढतील. उद्धव ठाकरे यांच्या सेनेची मशालही झळाळून निघेल, असे एकूणच राज्यातील निवडणुकांचे केले जाणारे विश्लेषण बऱ्यापैकी सत्याजवळ जाणारे वाटते. मतदानप्रक्रियेत यंदा कडक उन्हाबरोबरच पावसाचाही अडथळा जाणवला. पुढच्या टप्प्यात त्यादृष्टीने काळजी घ्यावी लागेल. मतटक्का आता कुणाला धक्का देणार, हेच पहायचे.

Advertisement

Advertisement
Tags :

.