सर्वेक्षणाचा कालावधी 31 ऑक्टोबरपर्यंत वाढविला
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय : शिक्षकांची कामातून मुक्तता
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात सुरू असलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाचा कालावधी 31 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय रविवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती कन्नड-संस्कृती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री शिवराज तंगडगी यांनी दिली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज्यभरातील शाळा पुन्हा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर आणखी 9 दिवसांसाठी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षण कामातून शिक्षकांची मुक्तता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बेंगळूर वगळता राज्यभरात सर्वेक्षणाचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर रामनगरमध्ये 86 टक्के, धारवाडमध्ये 88 टक्के आणि बिदरमध्ये 79.46 टक्के सर्वेक्षणाचे काम थोडे मंदावले आहे. बेंगळूरमध्ये सर्वेक्षणाचे 45 टक्के काम झाले आहे. येथे सर्वेक्षण उशिरा सुरू झाल्यामुळे सर्वेक्षण कमी झाले आहे. काही जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षणाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत सर्वेक्षण सुरू राहणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये हे काम लवकरच पूर्ण होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
सर्वेक्षणात सहभागी कर्मचाऱ्यांना तीन दिवस सुटी
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर 20, 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात आली आहे. 23 ऑक्टोबरपासून सर्वेक्षणाला पुन्हा सुरुवात केली जाणार आहे. जिल्ह्यातील विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांचा वापर करून संबंधित जिल्हाधिकारी 23 ते 31 ऑक्टोबरदरम्यान सर्वेक्षणाचे काम पूर्ण करतील, अशी माहितीही मंत्री तंगडगी यांनी दिली.