सुरुचीला सुवर्ण, साईनामला रौप्य
वृत्तसंस्था/ डोहा
2025 च्या हंगामातील येथे सुरु झालेल्या आयएसएसएफच्या शेवटच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पहिल्या दिवशी भारताचे नेमबाज सुरुची सिंगने सुवर्णपदक तर साईनामने रौप्य आणि सम्राटने कांस्यपदक पटकाविले.
महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत सुरुची सिंगने 245.1 गुणासह सुवर्णपदक पटकाविले. याच क्रीडा प्रकारात भारताच्या साईनामने 243.3 गुणासह रौप्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात भारताची दुहेरी ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती मनू भाकरला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिने 179.2 गुण नोंदविले. जागतिक महिला नेमबाजांच्या मानांकनात गेल्या सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान सुरुची सिंगने अग्रस्थान पटकाविले होते. चालू वर्षीच्या नेमबाजी हंगामात सुरुचीने चार विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पाठोपाठ सुवर्णपदके मिळविली आहेत.
पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत भारताचा विश्वविजेता सम्राट राणाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या क्रीडा प्रकारात भारताचा वरुण तोमर चौथ्या स्थानावर राहिला. झज्जर येथे वास्तव्य करणारी सुरुची सिंग ही एका हवालदाराची कन्या आहे. सुरुचीला या सुवर्णपदकाबरोबरच 5 हजार युरोचे बक्षीस मिळाले तर साईनामला 4 हजार युरोचे बक्षीस देण्यात आले.
कर्नालचा नेमबाज सम्राट राणाला पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत कांस्यपदक मिळाले. कैरोमध्ये झालेल्या विश्व नेमबाजी स्पर्धेत सम्राट राणाने सुवर्णपदक मिळविले होते. या क्रीडा प्रकारात चीनच्या हु केईने सुवर्णपदक तर जर्मनीच्या स्पर्धकाने कांस्यपदक घेतले. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी रुद्रांक्ष पाटील आणि अर्जुन बबुता यांच्याकडून साफ निराशा झाली. पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत रुद्रांक्ष पाटीलने चौथे तर बबुताने सहावे स्थान मिळविले. महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत भारताच्या इलाव्हेनील व्हॅलेरवेन पात्र फेरीतच 9 व्या स्थानावर राहिल्याने तिला अंतिम फेरीत स्थान मिळू शकले नाही