सुरुची-सौरभ यांना नेमबाजीत सुवर्ण
वृत्तसंस्था/लिमा (पेरू)
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफच्या विश्व चषक रायफल-पिस्तुल-शॉटगन नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सुरूची आणि सौरभ चौधरी या नेमबाज जोडीने 10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. या क्रीडा प्रकारात सुरुची आणि सौरभ यांनी अंतिम फेरीत चीनच्या केई आणि क्वियानझून यांचा पराभव केला. आयएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील सुरुचीचे हे तिसरे सुवर्ण तर सौरभचे नववे पदक आहे. मिश्र सांघिक प्रकारातील सौरभचे हे पाचवे सुवर्ण पदक आहे. सुवर्णपदकासाठीच्या अंतिम फेरीत सुरूची आणि सौरभ यांनी चीनच्या क्वियानझून व केई यांचा 17-9 अशा फरकाने पराभव केला. पात्र फेरीमध्ये भारताची सौरभ आणि सुरूची या जोडीने 580 गुण नोंदविले होते.
तर चीनच्या क्वियानझून व केई यांनी 585 गुण घेत आघाडीचे स्थान मिळविले होते. नेमबाजीचा या क्रीडा प्रकारात भारताच्या मनु भाकर आणि रविंद्र सिंग यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या क्रीडा प्रकारातील झालेल्या कांस्य पदकासाठीच्या लढतीत चीनच्या झेंग आणि क्वियांकी यांनी मनु भाकर आणि रविंद्र सिंग यांचा 16-6 असा पराभव केला. या स्पर्धेमध्ये महिलांच्या स्कीट नेमबाजीत भारताच्या पॅरिस ऑलिम्पिक नेमबाज रेझा धिलाँला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाअखेर भारताने दोन सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य अशी एकूण चार पदकांची कमाई करत दुसरे स्थान मिळविले.