For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीसमोर राजस्थानची शरणागती

06:58 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीसमोर राजस्थानची शरणागती
Advertisement

20 धावांनी विजय मिळवत प्ले ऑफच्या शर्यतीत कायम : संजूची वादळी खेळी वाया : कुलदीप यादव सामनावीर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

येथील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर 20 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 8 बाद 221 धावा केल्या. यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला 201 धावापर्यंत मजल मारता आली. दिल्लीचा हा 12 सामन्यातील सहावा विजय असून विजयासह त्यांनी प्ले ऑफच्या शर्यतीत आपले आव्हान कायम ठेवले आहे. दुसरीकडे, 16 गुणासह राजस्थानचा संघ दुसऱ्या स्थानी कायम आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आरआरला अजून एका विजयाची गरज आहे.

Advertisement

दिल्लीने दिलेल्या 222 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल (4 धावा) पहिल्याच षटकात तंबूत परतला. संजू सॅमसनने जोस बटलरच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अक्षर पटेलने बटलरला त्रिफाळाचीत करत दिल्लीला मोठे यश मिळवून दिले. बटलरने 17 चेंडूमध्ये 19 धावा केल्या. यानंतर रियान पराग आणि संजू सॅमसन यांनी राजस्थानची धावसंख्या वाढवली. दोघांनी अर्धशतकी भागिदारीही केली पण रियान परागने मोक्याच्या क्षणी विकेट फेकली. त्याने 27 धावांचे योगदान दिले.

संजू सॅमसनची एकाकी झुंज

एका बाजूला विकेट पडत असताना संजूने दुसऱ्या बाजूने फटकेबाजी केली. त्याने 46 चेंडूत 8 चौकार व 6 षटकरासह 86 धावांचे योगदान दिले. संजू मैदानात असेपर्यंत राजस्थानचा विजय टप्प्यात होता पण संजू बाद झाल्यानंतर इतर तळाच्या फलंदाजांनी निराशा केली. शुभम दुबे 25 तर रोव्हमन पॉवेल 13 धावा काढून बाद झाले. इतर फलंदाजांनीही निराशा केल्यामुळे राजस्थानला 20 षटकांत 8 बाद 201 धावा करता आल्या. हा सामना त्यांनी 20 धावांनी गमावला. दिल्लीकडून खलील अहमद, मुकेश कुमार व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

पोरेल, मॅकगर्कची तुफानी फटकेबाजी

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीचे सलामी फलंदाज मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांनी वादळी फलंदाजी केली. मॅकगर्कने अवघ्या 20 चेंडूमध्ये 50 धावांची खेळी केली. यामध्ये सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. मॅकगर्क बाद झाल्यानंतर शाय होप धावबाद झाला. लागोपाठ दोन गडी बाद झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला असणाऱ्या अभिषेक पोरेलने वादळी फलंदाजी केली. पोरेलने 36 चेंडूमध्ये 65 धावांचा पाऊस पाडला. या खेळीमध्ये त्यानं सात चौकार आणि तीन खणखणीत षटकार ठोकले.

पोरेल बाद झाल्यानंतर अक्षर पटेल आणि ऋषभ पंत प्रत्येकी 15 धावा काढून बाद झाले. लागोपाठ तीन विकेट पडल्यानंतर स्टब्स आणि नईब यांनी दिल्लीचा डाव सावरला. नईब आणि स्टब्स यांनी अखेरच्या षटकात धावांचा पाऊस पाडला. नईबने 15 चेंडूत 19 धावांची खेळी केली. यामध्ये एक चौकार आमि एक षटकार ठोकला. स्टब्सने 19 चेंडूमध्ये 41 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये तीन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. नईब व स्टब्जच्या या धमाकेदार खेळीमुळे दिल्लीने 8 बाद 221 धावांचा डोंगर उभा केला. कुलदीप यादवने पाच तर रसिख सलामने 9 धावा केल्या. राजस्थानकडून आर अश्विनने सर्वाधिक 24 धावांत 3 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

दिल्ली कॅपिटल्स 20 षटकांत 8 बाद 221 (मॅकगर्क 50, अभिषेक पोरेल 36 चेंडूत 65, शाय होप 1, अक्षर पटेल 15, ऋषभ पंत 15, ट्रिस्टन स्टब्ज 41, गुलबदिन नईब 19, आर.अश्विन 24 धावांत 3 बळी, बोल्ट, चहल व संदीप शर्मा प्रत्येकी 1 बळी).

राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 8 बाद 201 (जैस्वाल 4, जोस बटलर 19, संजू सॅमसन 46 चेंडूत 86, रियान पराग 27, शुभम दुबे 25, पॉवेल 13, खलील अहमद, मुकेश कुमार व कुलदीप यादव प्रत्येकी दोन बळी).

संजू सॅमसनचे अनोखे रेकॉर्ड

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने अनोखा विक्रम केला आहे. संजू आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद 200 षटकार ठोकणारा भारतीय खेळाडू बनला आहे. त्याने महेंद्रसिंग धोनीचा रेकॉर्ड मोडला. धोनीने आयपीएलमध्ये 168 डावांत 200 षटकार ठोकले आहेत. संजूने ही कामगिरी अवघ्या 159 डावांतच केली. दरम्यान, संजू सॅमसन आयपीएलमध्ये 200 षटकार ठोकणारा पाचवा भारतीय खेळाडू आहे.

आयपीएलमध्ये सर्वात जलद 200 षटकार ठोकणारे खेळाडू

  1. संजू सॅमसन - 159 डाव
  2. महेंद्रसिंग धोनी - 168 डाव
  3. विराट कोहली - 180 डाव
  4. रोहित शर्मा - 185 डाव

Advertisement
Tags :

.