सूरमा क्लबचा लान्सर्सवर विजय
वृत्तसंस्था/ राऊरकेला
येथे सुरु असलेल्या पुरुषांच्या हॉकी इंडिया लीग स्पर्धेतील सामन्यात सूरमा हॉकी क्लबने वेदांता कलिंगा लान्सर्सचा 5-3 अशा गोलफरकाने पराभव केला. या स्पर्धेत बंगाल टायगर्सने दिल्ली पायपर्सचे आव्हान 2-1 असे संपुष्टात आणत उपांत्य फेरी गाठली.
सूरमा क्लब आणि वेदांत कलिंगा लान्सर्स यांच्यातील सामन्यात 5 व्या मिनिटाला कलिंगा लान्सर्सचे खाते दिलप्रित सिंगने उघडले. प्रभज्योत सिंगने सूरमा क्लबचा पहिला गोल 26 व्या मिनिटाला नोंदविला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. उत्तरार्धातील खेळाला प्रारंभ झाल्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला हरमनप्रित सिंगने सूरमा क्लबचा दुसरा गोल तसेच 33 व्या मिनिटाला निकोलास किनेनने तिसरा गोल केला. 44 व्या मिनिटाला थिएरी ब्रिंकमनने कलिंगा लान्सर्सचा दुसरा गोल केला. मनिंदर सिंगने 51 व्या मिनिटाला तर हरमनप्रित सिंगने 54 व्या मिनिटाला सूरमा क्लबतर्फे गोल केले. 56 व्या मिनिटाला गुरसाहिबजित सिंगने कलिंगा लान्सर्सचा तिसरा गोल केला. अखेर हा सामना सुरमा क्लबने 5-3 अशा गोल फरकाने जिंकून 3 गुण वसूल केले.
बंगाल टायगर्स आणि दिल्ली पायपर्स यांच्यातील सामन्यात बंगाल टायगर्सने दिल्ली पायपर्सचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. या सामन्यातील शेवटच्या 5 मिनिटांमध्ये बंगाल टायगर्सचे 2 गोल नोंदविले गेले. या विजयामुळे बंगाल टायगर्सने 9 सामन्यातून 18 गुणांसह गुणतक्त्यात आघाडीचे स्थान घेत शेवटच्या 4 संघात प्रवेश केला. त्यांनी 6 सामने जिंकले असून 3 सामने गमावले आहेत.