गणेश हुक्केरींसह इतर आमदारांशी सुरजेवालांची चर्चा
प्रतिनिधी/ बेंगळूर
पक्षातील असंतुष्ट आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी बेंगळूरला आलेले राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला बुधवारी सायंकाळी नवी दिल्लीला परतले. तीन दिवसांच्या कालावधीत त्यांनी बेंगळूर आणि म्हैसूर विभागातील 40 आमदारांशी चर्चा केली. बेळगाव जिल्ह्यातील काही आमदारांशीही त्यांनी चर्चा केली असून बुधवारी आमदार गणेश हुक्केरी यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, बेळगाव विभागातील काँग्रेस आमदारांची मते जाणून घेण्यासाठी 7 जुलै रोजी सुरजेवाला पुन्हा राज्य दौऱ्यावर येतील.
नेतृत्त्वबदल आणि विकासकामांसाठी अनुदान मिळत नसल्याबद्दल राज्य काँग्रेसमधील अनेक आमदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. याची गांभीर्याने दखल घेत हायकमांडने सुरजेवाला यांना बेंगळुरात पाठविले. उघडपणे वक्तव्ये करणाऱ्या आमदारांसह बेंगळूर आणि म्हैसूर विभागातील काँग्रेसच्या 40 आमदारांशी सुरजेवाला यांनी सोमवारपासून तीन दिवस चर्चा केली. आमदारांनी सुरजेवालांकडे मंत्र्यांविषयी तक्रारी मांडल्या. त्यानंतर बुधवारी त्यांनी दिल्लीला प्रस्थान केले. आमदारांकडून जाणून घेतलेली मते ते हायकमांडकडे सादर करतील.
बुधवारी मतदारसंघांतील विकासकामे आणि योजनांच्या मुद्द्यावर आमदार गणेश हुक्केरी, नयना मोटम्मा, के. एम. शिवलिंगेगौडा, जी. एच. श्रीनिवास, के. एस. आनंद, ए. एस. पोन्नण्णा, कदलूर उदय यांच्याशी सुरजेवाला यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. यावेळी आमदारांनी मतदारसंघांतील विकासकामांसाठी मिळालेला निधी, विकासकामांची प्रगती आणि पक्षसंघटनेसाठी केलेल्या कामांची माहिती दिली.