रोबोट तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दोन कॅन्सर रुग्णांवर शस्त्रक्रिया
केएलई डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळातील डॉक्टर यशस्वी
बेळगाव : केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून दोन कॅन्सर रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. बेंगळूर, मंगळूरनंतर शस्त्रक्रियेसाठी रोबोटचा वापर बेळगावात सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती इस्पितळाचे वैद्यकीय संचालक कर्नल डॉ. दयानंद यांनी दिली. कॅन्सरतज्ञ डॉ. कुमार विंचूरकर व डॉ. महेश कल्लोळ्ळी यांनी दोन रुग्णांवर रोबोटिक तंत्रज्ञानाने शस्त्रक्रिया केली असून ही शस्त्रक्रिया रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. गेल्या तीन दशकांपूर्वी रोबोटिक तंत्रज्ञानाला सुरुवात झाली. दोन दशकात आरोग्य क्षेत्रातही रोबोटचा वापर
सुरू झाला. आता अवघड शस्त्रक्रियेसाठीही त्याचा वापर करण्यात येत आहे, असे डॉ. दयानंद यांनी सांगितले. भारतातच तयार करण्यात आलेल्या एसएसआय तंत्रज्ञानाचे हे रोबोट असून दोन कॅन्सर रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. महेश कल्लोळ्ळी, डॉ. कुमार विंचूरकर, डॉ. दिवाकर, डॉ. राहुल केनवाडेकर, भूलतज्ञ डॉ. राजेश माने यांनी ही शस्त्रक्रिया केली आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेसंबंधीचे तंत्रज्ञान सातत्याने विकसित होत आहे. केएलई इस्पितळातील सुमारे 30 तज्ञ डॉक्टरांना यासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात आले असून रोबोटच्या मदतीने होणारी शस्त्रक्रिया ही खासकरून कॅन्सर रुग्णांसाठी प्रभावी ठरते आहे. सध्या स्त्राrरोग, मूत्रपिंड आदींसह चार प्रमुख विभागांसाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून थ्रीडी तंत्रज्ञान, हायडेफिनेशन कॅमेरे व अत्याधुनिक उपकरणांमुळे अत्यंत अवघड शस्त्रक्रिया सहजपणे शक्य होऊ लागल्या आहेत.
या तंत्रज्ञानाच्या आविष्कारामुळे पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षाही कमी जखम होते. केवळ की-होलच्या माध्यमातून रुग्णावर शस्त्रक्रिया केली जात आहे. रक्तस्रावही कमी होतो. अत्यंत कमी वेळेत रुग्ण बरा होतो. संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांच्या पुढाकारातून हे तंत्रज्ञान केएलई इस्पितळात उपलब्ध करून देण्यात आले असून पारंपरिक व लॅप्रोस्कोपिक उपकरणांपेक्षाही रोबोटिक शस्त्रक्रिया प्रभावी ठरते आहे. या तंत्रज्ञानामुळे डॉक्टरांवरील दबावही कमी होतो. पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या शस्त्रक्रियेवेळी रुग्णांना अनेक वेळा संसर्गाचा धोका असतो. या पद्धतीने हा धोका कमी झाला आहे. अत्यंत कमी वेळेत रुग्णाला घरी पाठविण्यात येते. त्यामुळे खर्चही वाचतो, असे त्यांनी सांगितले.
अवघड शस्त्रक्रिया यशस्वी
नरगुंद येथील 62 वर्षीय रुग्णाच्या अन्ननलिकेला कॅन्सर झाला आहे. पारंपरिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णाच्या शरीरावर तीन ठिकाणी छेद द्यावा लागला असता. मात्र, रोबोटिक तंत्रज्ञानामुळे केवळ तीन की-होलच्या माध्यमातून ही आठ तासांची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.
- डॉ. महेश कल्लोळ्ळी
शस्त्रक्रिया अत्यंत सुलभ-अचूक
सत्तर वर्षीय महिला मूत्रपिंडाच्या कॅन्सरने त्रस्त होती. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय झाला. पारंपरिक पद्धतीने शस्त्रक्रिया करणे अवघड होते. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे ही अवघड शस्त्रक्रिया अत्यंत सुलभ आणि अचूकपणे पूर्ण करण्यात आली आहे.
- डॉ. कुमार विंचूरकर